मुंबई
आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. निवडणुकांपूर्वी मविआच्या नेत्यांना मोठा दणका दिला जात असल्याचं दिसून येत आहे. काही तासांपूर्वी शरद पवार गटाचे रोहित पवार यांना ईडीकडून नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातच ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स जारी केलं आहे. एकाच दिवसात मविआच्या दोन नेत्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
निवडणुकांपूर्वी रोहित पवार अडचणीत सापडले असून बारामती अॅग्रो प्रकरणात ईडीने नोटीस पाठवली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून समन्स जारी करण्यात आलं आहे. यावरुन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपचं गलिच्छ राजकारण सुरू असून स्वायत्त यंत्रणाचा चुकीचा वापर केला जात आहे आणि हा दहशत पसरवण्याचा प्रयत्न आहे. आमच्यासोबत आला नाही तर तुमच्यामागे ईडी लावु हे भाजपचं धोरण असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या..
राजापूर-लांजा मतदारसंगाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर काल गुरूवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं ( एसीबी ) धाड टाकली. दुसरीकडे युवासेनेचे नेते, सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) बुधवारी ( १७ जानेवारी ) अटक केली आहे. त्यात आज किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स जारी केलंय. त्यामुळे दिवसेंदिवस ठाकरे गटाच्या अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे. या कारवाईनंतर आमदार राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली. कितीही धाडी टाकल्या, तुरुंगात टाकलं तरीही ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.