मुंबई
एप्रिल महिन्यात राज्यसभेतील राज्यातील सहा जागा रिक्त होणार असल्याने राज्यसभेत कोणाला पाठवायचं यावरुन महायुतीत संगीत खुर्ची सुरू झाली आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. पार्थ पवारांसह विनोद तावडे, विनय सहस्त्रबुद्धेंनांही राज्यसभेत पाठवण्याची चर्चा आहे. शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पडल्याने महायुतीला फायदा होणार असून सहा पैकी पाच जागांवर महायुती दावा दाखल करू शकते.
राज्यातून राज्यसभेत कोणाला पाठवायचं याची तयारी सुरू आहे. एप्रिल महिन्यात राज्यसभेतील राज्यातील सहा जागा रिक्त होणार आहेत. पार्थ पवार, विनोद तावडे, विनय सहस्त्रबुद्धे यांच्याशिवाय मिलिंद देवरा यांचंही नाव समोर येत आहे. दक्षिण मुंबई लोकसभेची जागा भाजपने घेतली तर शिंदे गटात आताच प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा यांच्यासाठी राज्यसभेतील जागा मोकळी ठेवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे पार्थ पवारांनी २०१९ मध्ये मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी त्यांचा पराभव केला. तेव्हा श्रीरंग बारणे यांना ५३.२६ टक्के मतदार झालं होतं तर पार्थ पवारांना ३७.२९ टक्के. त्यामुळे यंदा शिंदेंच्या शिवसेनेने मावळचा दावा सोडला नाही, तर पार्थ पवारांसाठी राज्यसभेचा मार्ग मोकळा ठेवला जाणार आहे.
राज्यसभेतून कोण निवृत्त होतंय
नारायण राणे – भाजप
व्ही मुरलीधरन – भाजप
प्रकाश जावडेकर – भाजप
अनिल देसाई – ठाकरेंची शिवसेना
कुमार केतकर – काँग्रेस
वंदना चव्हाण – राष्ट्रवादी (शरद पवार)
२ एप्रिलला राज्यसभेतील राज्यातील ६ जागा रिक्त होणार असून लवकरच यासाठीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. येथे विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला ४८ आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यामुळे काँग्रेसला फार तर एक खासदार मिळू शकतो. महाराष्ट्र विधानसभा २८८ जागा – भागिले सहा जागा म्हणजे एका जागेसाठी जवळपास ४८ चा कोटा आहे. सध्या काँग्रेसकडे ४४ आमदार, ठाकरे गटाकडे १५, शरद पवार गटाकडे १०-१२ आमदार आहेत. काँग्रेसला ठाकरे-पवारांची मदत मिळाली तर एक खासदार शक्य आहे. दुसरीकडे ठाकरेंचे अनिल देसाई फक्त १५ आमदारांवर निवडून येणं शक्य नाही. किंवा अगदीच दोन्ही पक्ष एकत्र लढले तरीही २५ ते २६ बळ पुरेसं नाही.
नारायण राणे आणि प्रकाश जावडेकर यांना पुन्हा राज्यसभेत जाता येणार की त्यांचं तिकीट कापलं जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.