मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. याशिवाय ईडी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. दरम्यान ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले. रोहीत पवारांना अटक होणार, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणात रोहित पवारांची अंमलबजावणी संचालनालयामार्फत चौकशी केली जात आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत असताना शिखर बँकेतर्फे त्याचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात इच्छुक कंपन्यांनी अनेक बँकातून पैसे उचलले होते. या लिलावाच्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. त्यावेळी बारामती अॅग्रोने हा कारखाना केवळ ५० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. याशिवाय या लिलाव प्रक्रियेत ज्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या, त्यांच्यातील आपसात झालेले आर्थिक व्यवहारही संशयास्पद असल्याचा दावा केला जात आहे.
यावेळी रोहित पवारांसोबत सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, यावर प्रतिक्रिया देता त्या म्हणाल्या, हा आमचा संघर्षाचा काळ आहे. मात्र सत्याचाच विजय होईल. आव्हानं येत राहतील, आम्ही संघर्ष करू. मात्र सत्याच्याच मार्गाने जाऊ. ही आमची लढाई आहे. ईडी, आयकर विभाग या स्वायत्त संस्थाचा उपयोग विरोधकांवर केला जात आहे. संसदेच्या अधिकृत डेटानुसार या संस्थामार्फत केलेल्या ९५ टक्के कारवाया विरोधकांवर केल्या गेल्या आहेत. यावरुन सत्ताधाऱ्यांकडून या संस्थांचा गैरवापर केला जात आहे.