पुणे
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांची तोफ पुण्यात दाखल झाली आहे. दरम्यान आज पहाटे जरांगेंकडे आरक्षणाचा प्रस्ताव घेऊन सरकारचे प्रतिनिधी आले होते, त्यांच्याकडून तपशील देण्यात आला आणि मुंबईचा दौरा टाळण्याचा आग्रहही करण्यात आला होता. मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शिष्टाईसाठी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींना रिकाम्या हाताने परतावे लागले.
मराठा आरक्षण आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. पुण्यातही जरांगे पाटलांचा मोठ्या गर्दीने स्वागत करण्यात आलं. आज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहेत. आता वाघोली, शिवाजीनगर, चिंचवड, देहू रोड असा प्रवास करीत हा मोर्चा आज रात्री लोणावळ्याला मुक्कामासाठी येणार आहे. उद्या जरांगे पाटील मुंबईत दाखल होणार आहेत. यावेळी वाहतुकीचा मोठा प्रश्न उद्भवू शकतो. त्यातच मुंबईत मंगळवारपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एका ठिकाणी जमण्यास बंदी घालण्यात आली असून ही जमावबंदी १५ दिवसांची असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय मंगळवारी मध्यरात्री रांजणगाव येथे आले होते. अडीच तासाच्या प्रतिक्षेनंतर त्यांना जरांगेंची वेळ मिळाली. पहाटे ४ वाजता चर्चेला सुरुवात झाली, दीड तास जरांगे पाटलांना मुंबईचा दौरा टाळण्याचा आग्रह करण्यात आला. मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.