Twitter : @NalavadeAnant
मुंबई
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, पोलिसांनीही सांगितले की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती, त्या माहीमचे आमदार सदा सरवणकर यांची मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सदा सरवणकर यांच्या नियुक्तीवरून सरकारवर टीका केली आहे.
महायुतीच्या सरकारमध्ये शासकीय महामंडळाच्या वाटपावर एकमत होत नसताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आपले समर्थक सदा सरवणकर यांची सिद्धिविनायकच्या अध्यक्षपदी वर्णी लावून मित्र पक्ष विशेषतः राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जोरदार धक्का दिल्याचे मानले जाते.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात म्हणजे जुलै २०१७ मध्ये सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या आदेश बांदेकर यांची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली होती. उद्धव ठाकरे सरकारने जुलै २०२० मध्ये बांदेकर यांची नियुक्ती कायम ठेवली. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये आदेश बांदेकर यांची मुदत संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सिद्धिविनायक मंदिराचा आग्रह धरला होता. काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. त्यावेळी राष्ट्रवादीने नरेंद्र राणे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून सिद्धिविनायकसारख्या पवित्र संस्थेची जबाबदारी सोपवली याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी गेली अनेक वर्ष मंदिर परिसरात गणेश भक्तांच्या अडचणी पाहिल्या आहेत. त्यामुळे आता मला गणेश भक्तांसाठी बरेच काम करता येईल, अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी नियुक्तीनंतर दिली.
आदित्य ठाकरे यांची टीका
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सदा सरवणकर यांच्या नियुक्तीवरून सरकारवर टीका केली आहे. दादरमध्ये ह्यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, पोलिसांनीही सांगितले की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच पण मिंधे- भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले. हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचे लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, अटक व्हायला हवी होती! पण… ह्या कृत्याबद्दल त्याला बक्षीसच मिळाल्याचे दिसते, अशी उपरोधिक टीका आदित्य ठाकरे यांनी आज एक्सवरून केली.
आमच्या सणवाराला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात? खरेतर भाजप किंवा गृहमंत्र्यांकडून ह्या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता. पण कदाचित हे गद्दारीचं आणि महाराष्ट्रद्वेषाचं बक्षीस दिलं असेल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.