मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली लोकसभेसाठी (Sangli Loksabha) काँग्रेसच्या माध्यमातून तयारी करत असलेल्या विशाल पाटील (Vishal Patil)यांना चंद्रहार पाटील (Chandrahar Patil )यांच्या उमेदवारीने जोरदार झटका दिला आहे. त्यांनंतर मात्र काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघात निवडणूक लढवणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे .सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आता मागे हटणार नाही या भूमिकेत असलेल्या काँग्रेस नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यासाठी आता बंधू प्रतीक पाटील (Pratik Patil) यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली आहे . त्यामुळे सांगलीसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .तसेच वंचितच्या माध्यमातून विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात रिंगणात उतरले तर आंबडेकर -पाटील मिळून ठाकरेंच्या उमेदवाराचा गेम करणार का ? या चर्चाना आता उधाण आलं आहे .
या भेटीवर वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे .सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं. पण, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली आहे असे त्यांनी सांगितलं . त्यामुळे काँग्रेसने आधी ठरवलं पाहिजे की, महाराष्ट्रामध्ये त्यांचं अस्तित्व त्यांना ठेवायचं आहे की नाही? दरम्यान आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील आणि त्यांचे बंधू प्रतीक पाटील येऊन गेले. चर्चाही त्यांनी केली. ते लवकरच काहीतरी निर्णय घेतील अशी मी अपेक्षा बाळगतो”, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली आहे .त्यामुळे या मतदारसंघात चंद्रहार पाटील यांच्यासमोर विशाल पाटलांचंच आव्हान असणार, असं दिसतंय. याला प्रकाश आंबेडकरांनीही दुजोरा दिला.
2019 मध्ये ज्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला त्याच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी अकोल्याला जाण्याची वेळ त्यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांच्यावर आली .दरम्यान सांगलीच्या रिंगणात नव्याने स्थापन झालेली ओबीसी बहुजन पार्टी सुद्धा रिंगणात असून प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) स्वत: रिंगणात आहेत. त्यामुळे कोण कोणाच्या किती मतांवर बाजी मारणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे