मुंबई – शाहू छत्रपती हे मूळचे कोल्हापूरचे आहेत का, ते तर दत्तक आहेत, त्यामुळं ते वारसदार नाहीत, कोल्हापूरची जनता ही खरी वारसदार आहे, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केल्यानं वादंग निर्माण झालेला आहे. मंडलिक यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठली आहे. मंडलिक यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज बंटी पाटील यांनी केलीय. कोल्हापूरकर जनता याबाबत मंडलिक यांना माफ करणार नाही, असंही सतेज पाटील म्हणाले आहेत. तर शरद पवार यांनीही यानिमित्तानं प्रचार किती खालच्या पातळीवर गेल्याची टीका केली आहे. मविआचे नेते मंडलिक यांच्यावर टीका करत असताना मंडलिक मात्र या विधानावर ठाम आहेत.
मंडलिक विधानावर ठाम
संजय मंडलिक यांनी या टीकेनंतर विरोधकांना उत्तर दिलं आहे. शाहू महाराज हे दत्तक नाहीत का, हे सांगाव, असं प्रतिआव्हान त्यांनी विरोधकांना दिलंय. मूळ मुद्दा दूर ठेून मंडलिकांनी माफी मागावी, अशी मागणी अयोग्य असल्याचं मंडलिक म्हणालेत. शाहू महाराजांचा अवमान करण्याचा हेतू नाही, मात्र त्यांनी मूळ वारसदार आहेत का हे सिद्ध करावं, असं आव्हान मंडलिक यांनी सतेज पाटील यांना दिलंय.
उमेदवारी अर्ज मागे घ्यावा- हसन मुश्रीफ
तर शाहू महाराज यांच्यावरील या विधानानंतर व्यथित झाल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलीय. शाहू महाराज यांनी त्यांची उमेदवारी मागे घ्यावी, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली आहे.
भाजपानं हात केले वर
याबाबत महायुतीत मोठा भाऊ असलेल्या भाजपानं हात वर केलेले दिसतायेत. मंडलिक यांनी केलेल्या टीकेवर संजय मंडलिक उत्तर देतील किंवा एकनाथ शिंदे उत्तर देतील, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलीय. त्यामुळं या वादात पडणार नाही, असं भाजपाचं धोरण असल्याचं स्पष्ट दिसतंय.