मुंबई- जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपात पुन्हा उमेदवार बदलांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारुन स्मिता वाघ यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यामुळं नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी करण पाटील यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं या मतदारसंघातून करण पाटील यांना उमेदवारी दिलीय. उन्मेष पाटील यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळं भाजपाचा हक्काचा मतदारसंघ अडचणीत आल्याचं मानण्यात येतंय. त्यामुळंच स्मिता वाघ यांच्याऐवजी दुसऱ्या नेत्याला उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
कुणाच्या नावाची चर्चा
२००९ आणि २१०४ साली निवडून आलेले जळगावचे माजी खासदार ए टी पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे. एटी पाटील यांनीही दिल्ली आणि मुंबईत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी घेतलेल्या भेटींमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत एका व्हीडिओ क्लिपमुळे ए टी पाटील अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी न देता त्यांच्याऐवजी उन्मेष पाटील यांना संधी देण्यात आली होती. आता उन्मेष पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यानं पुन्हा एकदा ए टी पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.
स्मिता वाघ यांच्यावर दुसऱ्यांदा नामुष्की
२०१९ लोकसभा निवडणुकांच्या वेळी स्मिता वाघ यांचे नाव पक्षानं जाहीर केलं होतं. त्यांचा प्रचारही सुरु करण्यात आला होता. त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले होते. मात्र ऐनवेळी भाजपानं उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. स्मिता वाघ यांनी त्याहीवेळी नाराजी व्यक्त केली नव्हती. आता याही वेळी स्मिता वाघ यांना उमेदवारीपासून माघार घ्यावी लागते का, हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचाःदुसरं नेतृत्व उभं राहू नये म्हणून सांगलीत विशाल पाटलांचा गेम? कोणी फिरवली प्यादी, कोण पडलं बळी?