मुंबई : संजय निरूपम यांच्या घराबाहेर लावलेले पोस्टर आणि त्यांनी सोशल मीडियावरुन दिलेली माहिती या दोन्ही गोष्टी एकमेंकाविरोधात आहे. यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. संजय निरूपम यांच्या घराबाहेर त्यांना निलंबित केल्याबद्दल मुंबई युवा काँग्रेसकडून धन्यवाद मानण्यात आले. तर दुसरीकडे संजय निरूपमांनी सोशल मीडियावरुन निलंबनाच्या कारवाईपूर्वीच काँग्रेसमधून राजीनामा दिल्याचं सांगितलं.
संजय निरूपमांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, काँग्रेसपासून मुक्ती मिळाल्यानंतर आज खूप हलकं वाटतंय. हृदयावरच ओझं कमी झाल्याची भावना आहे. संपूर्ण काँग्रेस कुटुंबाचे आभार अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर दुसरीकडे संजय निरूपमांच्या घराबाहेर मुंबई युवा काँग्रेसने धन्यवाद AICC चा बोर्ड लावला आहे. यात बेशिस्त संजय निरूपम यांना निलंबित करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे आभार मानले. संजय निरूपम यांनी पक्ष नेत्यांचा अवमान करत टीका केल्यास त्यांना मुंबईत फिरू देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.
बुधवारी रात्री काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षशिस्तभंग आणि पार्टी विरोधातील वक्तव्यांच्या तक्रारीनंतर निरूपम यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याची मंजुरी दिली होती. तर दुसरीकडे संजय निरूपम यांनी गुरुवारी सकाळी दावा केला होता की, त्यांनी आधीच पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केलं.
उत्तर-पश्चिम मुंबईतून तिकीट न मिळाल्याने निरुपम नाराज
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम काँग्रेसवर नाराज आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना उद्धव आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शरद पवार हे महाविकास आघाडीत आहेत. 27 मार्च रोजी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने 17 उमेदवारांची घोषणा केली होती. निरुपम यांच्या पसंतीच्या जागेवरून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर खुद्द राहुल गांधी यांनी निरुपम यांना येथून तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन दिलं होतं.