मुंबई- उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे इच्छुक नेते संजय निरुपम उद्या काँग्रेसला रामराम करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. उद्या संजय निरुपम काँग्रेसचा राजीनामा देणार असून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निरुपम यांना उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या निरुपम यांनी पक्षाला एका आठवड्याचा कालावधी दिला होता. मात्र त्यात निर्णय न झाल्यानं त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय.
निरुपम का नाराज
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं निवडणूक लढवावी अशी आग्रही भू्मिका निरुपम पहिल्यापासून मांडत होते. महाविकास आघाडीत या जागेबाबत बोलणी सुरु असताना उद्धव ठाकरेंनी परस्पर या जागी अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा केली. काँग्रेस नेत्यांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली मात्र त्यात पुढं काहीच घडलं नाही. अमोल किर्तिकरांना उमेदवारी जाहीर झाली, त्याच दिवशी त्यांना खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीची नोटी,सही आली होती. त्यावेळी निरुपम यांनी खिचडीचोर किर्तीकरांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतलीय.
निरुपमांना भाजपाकडून तिकिट
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवाराचा शोध घेण्यात येतोय. गजानन किर्तीकर यांनी मुलाविरोधात लढण्यास नकार दिल्यानं नव्या चेहऱ्याचा शोध सुरु आहे. अभिनेता गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झआल्यानंतर या जागी गोविंदाला तिकिट देणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र गोविंदा आणि मुख्यमंत्री दोघांनीही याला नकार दिलाय. त्यानंतर आता रवींद्र वायकर यांच्या नावाचा विचार या ठिकाणाहून सुरु आहे. मात्र निरुपम शिंदेंच्या शिवसेनेत आल्यास त्यांना या ठिकाणाहून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेसकडूनही कारवाईची तयारी
दुसरीकडे काँग्रेसकडूनही निरुपमांवर कारवाईची तयारी सुरु करण्यात आलीय. संजय निरुपम यांची स्टार प्रचारकांच्या यादीतून गच्छंती करण्याचा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आलाय़. संजय निरुपम यांची काँग्रेस मधून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. दिल्लीत पक्षश्रेष्ठी संजय निरुपम यांच्याबाबतचा निर्णय घएतील असं सांगण्यात आलंय.
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. काँग्रेस शिस्तपालन समिती याबाबतचा निर्णय घेणार आहे.