मुंबई : कथित मद्य विक्री घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांना राऊस जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. त्यानंतर ‘आप’चे नेते आणखी आक्रमक झाले आहेत. दिल्लीच्या मंत्री आतिशी (Atishi Marlena) यांनी यावरून भाजपवर ताशेरे ओढत त्यांच्यावर आरोप केले आहेत भाजपमध्ये या नाहीतर एक महिन्यात तुरुंगात जा, अशी ऑफर भाजपने दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. या मुद्द्यावरून आता दिल्ली (Delhi) भाजपने आज आतिशी यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. आतिशी यांनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी नोटिशीद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे आता आतिशी काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता आहे.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा (Virendra Sachdeva)यांनी नोटिशीबाबत माहिती दिली आहे . ते म्हणाले , आतिशी यांना कुणी, कधी आणि कशी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, याचे पुरावे त्या देऊ शकल्या नाहीत. दिल्ली आप (AAP) समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे नेते बिनबुडाचे आरोप करत आहेत. मात्र, आम्ही त्यांना असेच सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे .दरम्यान आम आदमी पक्षासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत. (Delhi Political News) इतर काही नेत्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपने आपच्या नेत्या आणि दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांना अडचणीत आणले आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा चांगला चर्चेत आला आहे.. याबाबत मंत्री आतिशी म्हणाल्या, माझ्यासह सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि खासदार राघव चड्ढा यांनाही अटक करतील. आम्हा सगळ्यांना तुरुंगात टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत आमच्या घरी ईडीचे रेड पडेल. माझे कुटुंब, नातेवाईकांच्या घरावरही रेड पडेल. समन्स पाठवले जाई आणि अटक करतील असा गौप्यस्फोट त्यांनी नावासकट केला आहे . त्यामुळे आपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .