X: @ajaaysaroj
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांच्यामुळे अटीतटीच्या लढतीमध्ये गणल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभेत उबाठा गटाने अखेर शिवसेना महिला आघाडीच्या वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. २००९ साली मनसेकडून याच मतदारसंघात लढताना त्यांनी तब्बल एक लाख मते मिळवली होती.
शिवसेनेत झालेल्या महाफुटीनंतर एक – एक जागा उबाठा गट आणि शिवसेना यांच्यासाठी महत्वाची झाली आहे. त्यातच कल्याण लोकसभा हा मतदारसंघ दस्तुतखुद्द मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र डॉ श्रीकांत यांचा विद्यमान खासदारकीचा मतदारसंघ आहे. त्यामुळे इथून उबाठा गट कोणाला उमेदवारी देतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई, सुषमा अंधारे यांच्यापासून ते केदार दिघे यांच्यापर्यंत सगळी नावे चर्चेत होती.
आदित्य ठाकरे यांचे नाव उबाठाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी जाणूनबुजून उठवण्यात आले होते, असे बोलले जाते तर वरुण यांचे नाव ते मूळचे डोंबिवलीकर असल्याने आणि युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामांमुळे चर्चेत आले होते. सुषमा अंधारे यांचे नाव माध्यमातून पुढे आले असले तरी डोंबिवली, कल्याणसारख्या मतदारसंघात अंधारेंच्या नावामुळे तीव्र नाराजीचा सूर उमटला होता. अंधारेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आधी केलेल्या संतापजनक विधानांमुळे शिवसेनेच्या मतदारांमध्ये अजूनही नाराजी आहेच. उबाठा विरोधकांच्या विरोधात अंधारे वाचाळ बडबड करत असतात, ती कार्यकर्त्यांना पसंत असते, त्याचे कारण अशी वाचाळ बडबड करणारे वाचाळवीर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आवडत असतातच, पण मतदारांचे तसे नसते, ही सुप्त नाराजी उबाठाच्या नेत्यांनीही हेरली होतीच, आणि परिणामी अंधारेचे नाव चर्चेतून देखील आपसूकच गायब झाले.
वैशाली दरेकर राणे या खरंतर कट्टर शिवसैनिक, महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामे ठाणे जिल्ह्यात सर्वश्रुत आहेत. त्या प्रथम शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. कल्याण – डोंबिवली महापालिका सभागृहात त्यांनी आपला ठसा उमटवला. अभ्यासू, मुद्देसूद आणि तितकेच आक्रमक भाषण ही त्यांची जमेची बाजू ठरली. राज ठाकरे यांच्या बंडानंतर त्या देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेल्या.
२००९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी मनसेच्या तिकिटावर लढली आणि राष्ट्रवादीचे वसंतराव डावखरे व एकसंघ शिवसेनेचे आनंद परांजपे यांच्या समोर एक लाखाहून अधिक मते मिळवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण लाखाच्या घरात लोकसभेला मते मिळवणारी मनसेची उमेदवार म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. पण मनसेची स्विच ऑन स्विच ऑफ कार्यशैली त्यांना जास्त काळ मनसेत थांबवू शकली नाही आणि त्यांनी शिवसेनेतील ऐतिहासिक महाफुटी आधीच शिवसेनेत प्रवेश केला. तब्बल चाळीस आमदार, तेरा खासदार आणि शेकड्यांनी नगरसेवक उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले, पण दरेकर या महाफुटीनंतरही शिवसेनेतच राहिल्या. या निष्ठेचे फळ आज त्यांना मिळाले आहे.
समोर कितीही तगडा उमेदवार असू दे, मी जिंकण्यासाठीच ही निवडणूक लढवत आहे असे वैशाली दरेकर – राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शिवसेनेने अजूनही डॉ श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याणची जागा भाजपला सोडून ठाण्याची जागा डॉ श्रीकांत शिंदेंनी लढवावी अशा प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. अवघ्या काही दिवसांत जागावाटप अंतिम झाले की चित्र स्पष्ट होईल.