महाराष्ट्र ताज्या बातम्या

32 टक्के मराठा समाजाच्या मतांवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून!

X : @milindmane70

मुंबई: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे – पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) अपक्ष उमेदवार द्यायचे नाहीत, अशी घेतलेली भूमिका, तसेच कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभांना मराठ्यांनी जायचे नाही, ज्याने – त्याने आपला निर्णय घ्यायचा, ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला मते द्यायची त्याला द्या, पण ज्यांनी आपल्याला साथ दिली नाही त्यांचा कार्यक्रम मात्र नक्की करायचा, ज्यांनी आपल्या आया – बहिणींची डोके फोडली त्यांना विसरू नका, आपल्या मराठा मावळ्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, मराठा मावळ्यांवर झालेल्या गुन्ह्यांची त्यांना जाणीव करून द्या, सगेसोयरे मुद्द्याच्या अंमलबजावणीवर आपण ठाम राहायचे, विधानसभेला पाहू, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य मराठा समाजाच्या मतांवर अवलंबून असल्याचा निष्कर्ष राजकीय चाणक्यांकडून वर्तवला जात आहे. 

राज्यातील एकही मराठ्यांनी जातीशी गद्दारी करू नये, मराठ्यांची ताकद, एकी आणि नेकी दाखवण्याची ही संधी आहे, असे संदेश सकल मराठा समाजाकडून मराठा समाजातील तरुणांना समाजाच्या माध्यमातून दिले जात आहे. आगामी काळातील निर्णय सर्व विचारवंत, डॉक्टर्स, वकील, लेखक, साहित्य व समाजातील इतर जेष्ठ विचारवंतांनी विचार विनिमय करून घ्यावा, असे आवाहन मराठा समाजाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होणार आहे. मराठ्यांच्या मतांसाठी त्यांना हाजी – हाजी करावे लागणारे एवढे मात्र निश्चित आहे. 

राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची (Maratha community) मते निर्णायक ठरणार असून उमेदवारांना विजयाकडे नेण्याची या मतांची ताकद असल्याने मराठा समाजाच्या या मतांसाठी सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आता कंबर कसली आहे. त्यासाठी मराठा समाजातील गावागावातील कार्यकर्त्यांना सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र मराठा समाजातील नेत्यांवर व गाव पातळीवरील कार्यकर्त्यांवर मागील काही काळापासून अन्याय करणाऱ्या नेत्यांना चांगला धडा शिकवण्याचा निर्धार मराठा समाजातील नेत्यांनी ठामपणे घेतल्याने सर्वच राजकीय पक्ष धास्तावले आहेत. 

जिल्हा निहाय मराठा समाजाचे मतदार

गडचिरोली 98,400, नंदुरबार 1 लाख 37 हजार, गोंदिया 2 लाख 12 हजार 500, भंडारा 2 लाख 44 हजार 500, चंद्रपूर 2 लाख 47 हजार 800, वर्धा 2 लाख 59 हजार, वाशिम 3 लाख 57 हजार 700, अकोला 4 लाख 20 हजार, जालना 4 लाख 27 हजार 500, धुळे 4 लाख 65 हजार 400, सिंधुदुर्ग 4 लाख 73 हजार 200, हिंगोली 4 लाख 74 हजार 200, अमरावती 6 लाख 30 हजार 900 ,बुलढाणा 7 लाख 59 हजार, धाराशिव 7 लाख 27 हजार, परभणी 7 लाख 28 हजार 300, यवतमाळ 7 लाख 54 हजार 700, नागपूर 7 लाख 82 हजार 600, नांदेड 8,30 हजार, रत्नागिरी 8 लाख 49 हजार 300, मुंबई शहर 8 लाख 69 हजार 900,  लातूर 9 लाख 68 हजार 800, संभाजीनगर 11 लाख 99 हजार, पालघर 11 लाख 52 हजार 400, जळगाव 15 लाख 9 हजार, सांगली 15 लाख 98 हजार 200, रायगड 16 लाख 56 हजार 200, सोलापूर 19 लाख 55 हजार 700, सातारा 21 लाख 15 हजार, नाशिक 21 लाख 98 हजार 800, अहमदनगर 25 लाख 48 हजार, कोल्हापूर 25 लाख 56 हजार, ठाणे 30 लाख 14 हजार, मुंबई उपनगर 35 लाख 34 हजार, पुणे 48 लाख 63 हजार 200.

राज्यात 32 टक्के मराठा समाज असताना दहा टक्के आरक्षण कसे? 20 टक्के आरक्षण पाहिजे, अशी मराठा समाजाची पूर्वीपासून मागणी आहे. सरकारने मराठ्यांची फसवणूक केली, दुधाची तहान मृगजळावर भागवली, अशी मराठा समाजाची भावना झाली आहे. इतर सर्व प्रवर्गांना लोकसंख्येच्या 50 टक्के आरक्षण तर मराठा समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत फक्त 10 टक्के आरक्षण,  त्यामुळे मराठा समाज पूर्णपणे नाराज आहे. त्यातच मनोज जरांगे – पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील भवितव्य मराठा समाजाच्या मतांवर अवलंबून असल्याचे मराठा समाजातील प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात