मुंबई : लोकसभेच्या तोंडावर हिंगोली लोकसभा मतदारसंघात (Hingoli Lok Sabha)राजकीय घडामोडीना वेग आला आहे . या मतदारसंघात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपच्या दबावामुळे विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Sriram Pati) यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे . तसेच यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारीचा पत्ता कट करण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी ट्विट करून जोरदार टीका केली आहे. शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे
शिंदे गटामध्ये चाललेल्या घडामोडींवर दानवे यांनी ट्विट करत खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ते म्हणाले , आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो? लोकसभा हा तर ट्रेलर आहे.. तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धवसाहेबांवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो? लोकसभा हा तर ट्रेलर आहे.. तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील असा टोला देखील त्यांनी लगावला आहे .
दरम्यान यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या पुन्हा एकदा उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र, त्यांचा पत्ता कट करण्यात आला असून या मतदारसंघातून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील (Rajashree Patil) यांना यवतमाळ-वाशिमची (Yavatmal Washim) उमेदवारी देण्यात आली आहे. भावना गवळी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दबावाल बळी न पडता उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र,आता जाहीर केलेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हेमंत पाटील यांच्या जागी आता बाबुराव कदम कोहळीकर यांना संधी देण्यात आली आहे.