मुंबई
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणातील निकाल जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत काढल्याची टीका केली. आता संजय राऊतांनीही यावर पलटवार केला आहे.
यावेळी राऊत म्हणाले, श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदेंचा मुलगा नाही का? एकनाथ शिंदे घराणेशाहीचा अंत झाल्याचं म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? सिद्ध करा नाही म्हणून, श्रीकांत शिंदेसाठी मुलगा म्हणूनच मत मागितलं ना, अशा शब्दात राऊतांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.
बाळासाहेब ठाकरे यांची घराणेशाही कधीच नव्हती, शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती, यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधीच नव्हती, विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा एक मार्ग असतो. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाहीचे पुरस्कर्ते आहेत. शिवसेनेला इतिहासात जमा करणारे स्वत: गाडले गेले, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला.
काल आमदार अपात्रतेच्या निकालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केल्याचा घणाघात राऊतांनी यावेळी केला. राहुल नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली आहे आणि संविधानाचा अपमान केल्याचा आरोप राऊतांनी केला.