मुंबई
आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल लोकशाही विरोधात असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला आहे. ही मॅच फिक्स होती असंही ते यापूर्वी म्हणाले आहेत. आज त्यांनी स्वत:च्या सोशल मीडियावरुन एक फोटो पोस्ट केला आहे. लोकशाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारा हा फोटो आहे. यात १९५० – २०२३ असं वर्ष लिहिलं असून शोकाकुलच्या पुढे महाराष्ट्राचा उल्लेख करण्यात आला आहे.
१० जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर केला आणि राज्यभरात गोंधळ उडाला. ठाकरे गटाने हा निकाल लोकशाहीविरोधात असल्याची टीका केली. यावेळी अध्यक्षांनी शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं जाहीर केलं. याशिवाय शिंदे यांनी विधीमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती जाहीर केली होती ती योग्य असून ठाकरे गटाला त्यांचा व्हिप पाळावा लागेल असंही दिसून येत आहे.
काल आमदार अपात्रतेच्या निकालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केल्याचा घणाघात राऊतांनी यावेळी केला. राहुल नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली आहे आणि संविधानाचा अपमान केल्याचा आरोप राऊतांनी केला.