मुंबई
सारथी, बार्टी, महाज्योतीच्या पीएचडी फेलोशीपच्या प्रवेश परीक्षेत सीलबंद पेपर न दिल्याने पुणे आणि नागपूरमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर बहिष्कार टाकला आणि पेपरफुटीचा प्रकार असल्याचा दावा केला आहे. यानंतर राज्यभरातून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. राज्यात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीची प्रकरणं पाहता विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात असल्याचं म्हटलं जात आहे.
यावर विरोधकांनीही चौकशीची मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर सरकारने श्वेत पत्रिका काढावी तसेच सर्व परीक्षा एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात याव्यात अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यातील बेरोजगारांचे भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, सरकारने खासगी आयटी कंपन्यांना नफा मिळवून देण्याचा उद्योग बंद करायला हवा. सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यातील बेरोजगारांचे भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधले गेले आहे.
पेपरफुटीची वाढती प्रकरणे लक्षात घेता पारदर्शक पद्धतीने परीक्षा होण्यासाठी टी.सी.एस. व इतर कंपन्यांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करण्यात यावी. पेपर फुटीचा आरोप होत असलेली सध्याची तलाठी पद भरती रद्द करावी. या परीक्षेसंदर्भात होत असलेल्या आरोपांची सरकारने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. या संपूर्ण पद भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी.