मुंबई
‘शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना’ असल्याचा निकाल काल १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. यानंतर राज्यभरात ठाकरे गटाकडून आक्रोश तर शिंदे गटाकडून जल्लोष साजरा केला जात आहे. यावेळी भाजपच्या नेत्यांनीही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचं समर्थन केलं.
निकालानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शेवटी सगळ्याचा “निकाल” लागलाच! देवाच्या काठीचा आवाज नसतो पण दणका जोरात असतो, अशा शब्दात शेलारांनी प्रतिक्रिया दिली.
यापुढे ते म्हणाले, मुंबईकरांनी करापोटी दिलेले कोट्यवधी रुपये ज्यांनी 25 वर्षे लुटले आणि बंगले बांधले, मुंबईकरांचे भूखंड गिळले, मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकले, नाल्यातील गाळात, रस्त्यावरच्या डांबरात, शाळेतील गरिब मुलांच्या साहित्यात सुध्दा कटकमिशन खाल्ले, कोविडमध्ये मुंबईकर उपचाराविना तडफडत असताना ज्यांनी आपली घरे भरली, मेट्रो, कोस्टलरोड, बुलेट ट्रेन असे मुंबईकरांचे विकास प्रकल्प स्वार्थासाठी अहंकाराने अडवून ठेवले, मुंबईतील मराठी माणसाला, प्रामाणिक करदात्यांना, गरीबांना, कष्टकऱ्यांना, श्रमिक, झोपडपट्टीधारकांना फसवून, लूटून कंत्राटदारांना, बिल्डरांना मालामाल केले, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ज्यांनी देव, देश आणि धर्माला सोडचिठ्ठी दिली, हिंदूच्या सणांवर बंदी आणली, देवांना बंदिवान केले, राम मंदिर, राम वर्गणीची खिल्ली उडवली, शेवटी सगळ्याचा “निकाल” लागलाच! देवाच्या काठीचा आवाज नसतो पण दणका जोरात असतो!! जय श्रीराम!! असं शेलारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.