मुंबई
२०१८ मध्ये शिवसेनेच्या घटनेत केलेली दुरुस्ती निवडणूक आयोगाला कळवली होती, विशेष म्हणजे मूळ चर्चा आमदार अपात्रतेवर करण्यात आलेली नाही. याशिवाय पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसं करायचं याचा राजमार्ग विधानसभा अध्यक्षांनी सांगितला, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. नार्वेकरांना पक्ष बदलण्याचा अनुभव असून त्यांनी स्वत:चा मार्ग मोकळा केला. विधानसभा अध्यक्ष या पदाला असलेल्या सुरक्षेचा त्यांनी गैरफायदा घेतला असंही ते पुढे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात आणि ते परिमाण असतं. आजच्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पायदळी तुडवण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशात पक्षाच्या घटनेवर सवाल उपस्थित केला नव्हता. शिंदे गटाला वेळकाढूपणा करायचा होता, त्यामुळे निवडणुकीपूर्वी दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायलाच हवं. यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहोत, असं म्हणत ठाकरेंनी पक्षाच्या घटनेबद्दल स्पष्टीकरण दिलं.
२०१८ पूर्वी पक्षात शिवसेना प्रमुख असं पद होतं, जे मी शिवसेना पक्षप्रमुख असं करून घेतलं, कारण शिवसेना प्रमुख केवळ बाळासाहेब ठाकरे. याची सूचना निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. आणि जर ते घटना ग्राह्य नसल्याचं म्हणत असतील तर गद्दार कसे निवडून आले? दुसरं म्हणजे जर आमची घटना तुम्ही ग्राह्य धरत नसाल तर आम्हाला अपात्र का केलं नाही? त्यामुळे हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. आणि जनतेलाही मान्य नाही, असं ठाकरे म्हणाले.
शिवसेना गद्दारांची होऊच शकत नाही…
शिवसेना कोणाची हे लहान मुलंही सांगू शकेल. त्यामुळे शिवसेना गद्दारांची कधीच होऊ शकत नाही. शिंदें आणि शिवसेना हे नातं तुटलेलं आहे.