मुंबई : शरद पवार हे सर्वोत्कृष्ट कृषीमंत्री होते, असं पंतप्रधान मोदीच अनेक वेळा म्हणाले आहेत. मोदींनी अनेकदा शरद पवार माझे राजकीय गुरू असल्याचंही विधान केलं आहे. त्यामुळे मोदी आता खोटं बोलत आहेत, अशा शब्दात संजय राऊतांनी मोदींच्या कालच्या यवतमाळ दौऱ्यानंतर हल्ला चढवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची काल यवतमाळमध्ये सभा झाली होती. यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यावरुन राऊतांनी आज मोदींवर जोरदार पलटवार केला. यावेळी राऊतांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्येचा मुद्दाही उपस्थित केला. काल पंतप्रधान ज्या यवतमाळमध्ये गेले होते, तेथे सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. मात्र मोदींना याचा विसर पडला, असंही राऊत यावेळी म्हणाले.
मोदी खोटं बोलतात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलतात. त्यांनी स्वत:ची जुनी वक्तव्य आठवावी. शरद पवार कृषीमंत्री होते त्यावेळी गुजरातमधील कृषी सहकार संदर्भात ते मोदींना मदत करीत होते. हे स्वत: नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. आता निवडणुकीसाठी ते खोटं बोलत आहेत. शरद पवार यांचा हात धरून मी राजकारणात आलो. ते माझे राजकीय गुरू आहेत, असं विधान मोदींनी यापूर्वी केलं आहे.
७० हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याच्या सूत्रधारांना आम्ही सोडणार नाही असं मोदी म्हणाले होते. मात्र सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवारांना त्यांनी आपल्यासोबत घेऊन उपमुख्यमंत्री केलं. आदर्श घोटाळ्याच्या सूत्रधाऱ्यांना पक्षात घेऊन राज्यसभेत घेतले. त्यामुळे पंतप्रधानांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा अशी मानसिकता महाराष्ट्रात नाही, असंही राऊत म्हणाले.