मुंबई
‘दाढीने काडी केली, तर तुमची लंका जळून जाईल’ असं वक्तव्य काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यावर आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खरमरीत टीका केली आहे. ‘लंका त्यांचीच आहे, आम्ही हनुमान आहोत. लंका रावणाची जळते. दाढी रावणाला होती, रामाला नाही. यासाठी एकनाथ शिंदेंना रामायण, महाभारत वाचावं लागेल’ अशा शब्दात संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर पलटवार केला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही राऊतांनी भाजपवर ताशेरे ओढले. आमचं हिंदुत्व लोकांच्या घरात चूल पेटवणारे. मात्र भाजपचं हिंदुत्व लोकांची घरं जाळणारं आहे. राज्यसभरातील मुस्लीम समाजाकडून उद्धव ठाकरेंना पाठिंबा आहे. मात्र निवडणूक आयोग आणि गृहमंत्रालय एकाच दिशेने काम करत असल्याचं राऊत म्हणाले.
११ फेब्रुवारी रोजी संजय राऊतांनी आणखी एक फोटो ट्विट केला होता. मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीत लाल सिंग नावाची व्यक्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्यक्तीविरोधात खंडणी, अपहरण अशा गुन्ह्याचे आरोप आहेत. याबाबत राऊत म्हणाले, पैचान कौन? मा. गृहमंत्री महोदय, हे लाल सिंग महोदय आहेत. खंडणी, अपहरण अशा सध्या किरकोळ ठरवल्या गेलेल्या गुन्हातील आरोपी. टीम मिंधेचे खास मेंबर. काय करणार तुम्ही? गुंडांनी गुंडासाठी चालवलेले राज्य, अशा शब्दात राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
आज १२ फेब्रुवारी रोजी राऊतांनी एकही फोटो ट्विट केला नाही. याबाबात ते म्हणाले, आज मुद्दाम त्यांचा गुंडांसोबतचा फोटो टाकला नाही. त्यांना गॅप दिली आहे. विश्रांती दिली आहे. ते घाबरेत, अस्वस्थ आहेत. रात्रीची झोपचही येत नाही. त्यामुळे फोटो टाकले नसल्याचे राऊत म्हणाले. मात्र येत्या काळात असे काही फोटो माझ्याकडून येणार आहेत, यातून अमित शहांनाही आपण नेमलेल्या माणसाबद्दल विचार करावा लागेल.