मुंबई- लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून होताना दिसतोय. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने असलेल्या फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकतडे करण्यात आलेली आहे. याबाबतचं पत्र संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवण्यात आलेलं आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबवण्यात येतात. यासाठी करण्यात येत असलेला खर्च हा नेमका कशातून होतो, असा सवाल राऊत यांनी या पत्रातून केला आहे.
500 ते 600 कोटींचा घोटाळा – राऊत
या फाऊंडेशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. वैद्यकीय मदत कक्ष, गणेशोत्सवात मंडळ आणि कोकणात नागरिकांना नेण्यासाठी एसटी बसेस, करमणूक आणि इव्हेन्टचा खर्च हा या फाऊंडेशनच्या माध्यमातून होतोय. या फाऊंडेशनच्या उत्पन्नाचा स्रोत काय, असा सवाल राऊत यांनी केलाय. या प्रकरणी धर्मदाय आयुक्तांकडे फाऊंडेशनची माहिती वकील नितीन सातपुते यांनी मागितलेली आहे. मात्र माहितीच्या अधिकारात ही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही, असा आरोपही राऊत यांनी केलाय. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या खात्यात 40 ते 50 लाखांची उलाढाल झालेली आहे, मात्र त्यांचा खर्च कोट्यवधी रुपयांचा असल्यानं, हे प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
निवडणूक रोख्यांप्रमाणे देणग्या घेतल्या जातायेत.
निवडणूक रोख्यांप्रमाणे सत्ताधारी नेते हे बिल्डर, कंत्राटदार यांच्याकडून देणग्या घेत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. सरकारी कंत्राटं दिल्यानंतर बिल्डर आणि संबंधित कंत्राटदारांकडून येणारे कमिशनचे पैसे हे रोखीत फाऊंडेशन, निवडणूक आणि राजकारणात रोखीनं वापरण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. ही राज्याची लूट असून, ईडीच्या कायद्यातंर्गत हा गुन्हा आहे. त्यामुळं या फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
या प्रकरणात ईडी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत, देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
हेही वाचाःराज ठाकरेंची आज मनसे नेत्यांसोबत बैठक, महायुतीच्या प्रचारासाठी समन्वय समितीची घोषणा करणार?