मुंबई : गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर ते महायुतीच्या प्रचाराला मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर एक बैठक घेऊन मनसेचे नेते महायुतीचा प्रचार करणार असल्याचं घोषित करण्यात आलं.
त्यापुढील कामासाठी राज ठाकरे आज मनसे नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंनी एक समन्वय समिती स्थापन करणार असल्याचं सांगितलं होतं. आज सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत या समितीची घोषणा करण्यात येणार आहे. महायुतीशी समन्वय ठेवण्यात काम या समितीमार्फत केलं जाणार आहे. याशिवाय या समितीच्या माध्यमातून महायुतीच्या प्रचाराचं प्लानिंग केलं जाणार असल्याची माहिती आहे. या समितीत बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, दिलीप धोत्रे, नितीन सरदेसाई यांचा समावेश असू शकतो.
राज ठाकरेंच्या गुढीपाडव्यातील भाषणाने अनेकांना धक्का बसला होता. या भाषणात मी पक्ष फोडणार नाही, व्यभिचार करणार नसल्याचं सांगत असताना भाषणाच्या शेवटी महायुतीला पाठिंबा दिल्याच्या घोषणेनंतर विरोधकांनी राज ठाकरेंना टार्गेट केलं जात होतं. राज ठाकरे यांना पक्ष फोडणं किंवा व्यभिचार आवडत नसेल तर पक्ष फोडून भाजपसोबत आलेले अजित पवार आणि एकनाथ शिंदे कसे चालतात? ते असलेल्या महायुतीला ते पाठिंबा कसा देऊ शकतात? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात होता.