अकलूज : विरोधी पक्षाचा एकही माणूस निवडून येऊ देऊ नका, याचा अर्थ रशियाचे पुतीन आणि भारताचे नरेंद्र मोदी यांच्यात काही फरक उरलेला नाही, असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर जहरी टीका केली. याशिवाय शरद पवारांनी भाजपच्या 400 पार या घोषणेची खिल्ली उडवली. भाजपने 400 पारऐवजी 543 पार असा नारा दिला पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले. मोदी संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करून हुकूमशाहीकडे निघाले आहेत, मोदी आश्वासने खूप देतात. मात्र त्याची अंमलबजावणी न करणे हे त्यांचे वैशिष्टय आहे अशी टीका पवारांनी यावेळी केली.
शरद पवार यांनी रविवारी अकलूज येथील विजयसिंह मोहिती पाटील यांच्या घरी डिनर डिप्लोमसीसाठी एकत्र जमले होते. यावेळी त्यांच्यासोबत सुशीलकुमार शिंदेंही उपस्थित होते. या नेत्यांची बंद खोलीत सुमारे तीन तास चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. १६ एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं पवारांनी सांगितलं, या भेटीचा परिणाम केवळ माढा मतदारसंघावर होणार नसून सोलापूर आणि बारामती या जागेवरही महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धैर्यशिल मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटातून माढ्याची निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे भाजप माढा जागेवरुन जिंकून येणं अवघड जाणार आहे. शरद पवारांनी फासे टाकत नगरनंतर माढा जागाही आपल्याकडून खेचून घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह नरेंद्र मोदींवर टीका केली. पवारांनी नरेंद्र मोदी यांची तुलना रशियातील पुतीन यांच्याशी केली आहे.