नवी दिल्ली
भारताच्या राजकारणातले महत्वाचे राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आडवाणींनी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
अयोध्येतील रामजन्मभूमी आंदोलनाचं मोठं श्रेय लालकृष्ण आडवाणींना जातं. आडवाणींनी १९९० मध्ये गुजरातमधील सोमनाथ ते उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंत रथयात्रा सुरू केली होती. 9 जून 2013 रोजी नरेंद्र मोदी यांची 2014 च्या निवडणुकीसाठी भाजपच्या निवडणूक प्रचार प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी 10 जून 2013 रोजी भारतीय जनता पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. अडवाणी यांनी 11 जून 2013 रोजी राजीनामा मागे घेतला. गेल्या काही वर्षांपासून प्रकृतीच्या कारणाने ते राजकारण फार सक्रिय नाहीत. मात्र राम मंदिर उभारणीच्या निमित्ताने त्यांची आणि राम मंदिर आंदोलनाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.
वयाच्या १४ व्या वर्षी आरएसएसमध्ये सहभाग
८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराचीमध्ये एका सिंधी हिंदू उद्योगपती कुटुंबात लालकृष्ण आडवाणींचा जन्म. त्यांचं प्राथमिक शिक्षण सेंट पॅट्रिक्स हायस्कूल, कराची येथून पूर्ण झाले आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते हैद्राबाद (सिंध) येथे आले. वयाच्या १४ व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. त्यामागेही एक रंजक कथा आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत ते आमला मित्र मुरली मुखीसोबत टेनिस खेळत होते. एक दिवस खेळता खेळता मुरली डाव अर्ध्यावर सोडून जाऊ लागला. यावेळी आडवाणींनी त्याला कुठे जात असल्याचं विचारलं. यावर मुरलीने सांगितलं, तो आरएसएसचा स्वयंसेवक झाला असून शाखेवर चाललाय. त्यानंतर दोन दिवसांनी आडवाणीदेखील आरएसएसच्या शाखेत सहभागी झाले.
फाळणीनंतर आडवाणी आपल्या कुटुंबासोबत भारतात स्थलांतरित होत मुंबईत स्थायिक झाले. त्यांनी बॉम्बे विद्यापीठाच्या सरकारी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि कायद्याची पदवी घेतली. संघात असताना त्यांनी आरएसएस साप्ताहिक ऑर्गनायझरच्या संपादनातही मदत केली. काही काळाने आडवाणी भारतीय जनता संघ श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्याने स्थापन केलेल्या भारतीय जनसंघात सामील झाले.
काही काळाने त्यांना दिल्लीत हलवण्यात आलं आणि ते सरचिटणीस आणि नंतर जनसंघाच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष बनले. यानंतर १९७७ मध्ये जनता पक्षाचा विजय, माहिती आणि प्रसारण मंत्रिपद, मध्य प्रदेशातून राज्यसभेवर जबाबदारी ते राम मंदिर आंदोलनापर्यंत आडवाणींनी पक्षासाठी दिवसरात्र एक केले.