मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे . या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज (Shahu maharaj )रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) मैदानात उतरले आहेत . या निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत . अशातच आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत बोलताना श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? असा सवाल करत ते खरे वारसदार नसून, गादीवर दत्तक आले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे . त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज यांनी उमेदवारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून साद घालण्यात आली होती. आजवरची घराण्याची परंपरा आणि पुरोगामी वसा लक्षात घेत शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला . त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर महायुतीकडून संजय मंडलिक मैदानात उतरले . त्यानंतर त्यांनी मतदारसंघातून जोरदार प्रचाराचा धडाका लावला .दरम्यान आज श्रीमंत शाहू महाराज यांच्याविषयी बोलताना त्यांचा बोलण्याचा तोल ढासळला .आताचे शाहू महाराज हे खरे वारसदार नसून तुम्ही आम्ही सर्व कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. तसेच माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूरोगामी विचार जपला असे मंडलिक म्हणाले आहेत. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायचे नाही मग ती कुस्ती कशी होणार? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला . आता यावरून कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे .
दरम्यान कागल तालुक्यामध्ये अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा गट संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी एकत्र आला आहे . याआधी कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif )यांनी कागल तालुक्यातील महायुतीतील तीन गट एकत्र येऊन मताधिक्य मिळवल तर साक्षात परमेश्वर आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे .