मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहा यांची भेट घेतल्यानंतर, मनसे महायुतीत जाणार, अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे. मनसेनं दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी केल्याचंही सांगण्यात येतंय. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटलेले आहेत. राज ठाकरेंनी मविआसोबत यावं, असं आवाहन सुप्रिया सुळेंनी केलं होतं. त्यातच उद्धव ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडं राज्याचं लक्ष होतं. अखेरीस उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत यावर भाष्य केलंय.
बुलढाण्याच्या सभेत काय म्हणालेत उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा सूरतमध्ये जाऊन वखार लुटली होती. सूरतेच्या माध्यमातून सूरतवाले आता आपला छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायेत. कोणालाच त्याची पडलेली नाहीये. ना मिंधेंना पडलेली आहे. ना अजित पवारांना पडलीय. आणखी कोण म्हटलं तर आमचे सगेसोयरे, या म्हणटलं की जातायेत. शेपूट हलवत जातायेत. अरे शरम वाटली पाहिजे. माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी जाून लोटांगणं घालताय. मी असं कधी आयुष्यात करु शकत नाही.
राज ठाकरे काय उत्तर देणार?
राज ठाकरे आणि अमित शाहा यांची भेट झाली असली तरी अद्याप युतीची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. राज ठाकरेंनी मागितलेल्या दोन जागा भाजपा सोडण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत मनसेसोबत महायुती होण्यावर प्रश्नचिन्ह असल्याची चर्चा आहे. मनसे स्वतंत्रपणे काही मतदारसंघात उमेदवार देण्याची शक्यता आहे. या सगळ्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला राज ठाकरे काय उत्तर देणार हे पहावं लागणार आहे.
हेही वाचाःअजित पवार घेरले जातायेत का? शिवतारेंचा विरोध, कुटुंबात एकटे, शरद पवार मैदानात, नेमकं चाललंय काय?