मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करुन बाहेर पडलेले राज्याचे तडफदार नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेरले जातायेत का, असा प्रश्न विचारण्यात येतोय. पहिल्यांदाच स्वबळावर मैदानात उतरलेल्या अजित पवारांना सगळ्याच आघाड्यांवर लढाई करावी लागत असल्याचं दिसतंय.
बारामतीत शिवतारेंचं आव्हान
अजित पवार यांचं होम ग्राऊंड अशी ओळख असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या संघर्षात दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यातच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि पवारांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे मैदानात उतरलेले आहेत. दोन्ही पवारांचा पराभव करण्याचा विडाच त्यांनी उचललाय, यासाठी ते पवारांविरोधात मोट बांधताना दिसतायेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला सबुरीचा सल्लाही ऐकण्याच्या स्थितीत ते दिसत नाहीयेत. पवारांचे विरोधक असलेल्या थोपटे, हर्षवर्धन पाटील यांना सोबत घेऊन बारामती लोकसभा लढवण्याच्या विचाराता ते आहेत. त्यांना थोपवण्याची जबाबदारी शिंदेंची असल्याचं अजित पवार सांगतायेत. मात्र अरेला कारे आपणही करु शकतो, असं सांगत अजित पवारांनी भविष्यासाठी इशारा दिल्याचं मानण्यात येतंय.
अजित पवार कुटुंबातही एकटे पडलेत?
बारामतीत हा संघर्ष सुरु असताना पवार कुटुंबातही अजित पवार एकटे पडल्याचं दिसतंय. रोहित पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार हे अजित पवारांविरोधात मैदानात दिसतायेत. तर अ्जित पवार यांचे सख्खे धाकटे बंधू श्रीनिवास पाटील आणि त्यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनीही सुप्रिया सुळे आणि शरद पवारांची तुतारी हाती घेतल्याचं दिसतंय. श्रीनिवास पवार यांनी केलेल्या टीकेनंतर अजित पवार या संघर्षात एकटे असल्याचं दिसतंय.
शरद पवारांची रणनीती
गेल्या दोन तीन दिवसांत जागावाटपात सक्रिय झालेल्या शरद पवारांनी निलेश लंके, बजरंग सोनावणे यासारखी माणसं पुन्हा त्यांच्या राष्ट्रवादीत आणलेली आहेत. शरद पवार करत असलेल्या या बेरजेच्या राजकारणाचा फटकाही अजित पवार यांना येत्या काळात बसण्याची शक्यता सांगण्यात येतेय. अनेक सहकारी अजित पवारांना सोडून शरद पवारांची साथ स्वीकारतील का, हे येत्या काळात पाहावं लागणार आहे.
लोकसभा जागावाटपात किती जागा?
अजित पवार यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार असले तरी खासदार मात्र बोटावर मोजण्या इतपत आहेत. त्यामुळे त्यांना लोकसभेच्या किती जागा लढण्याची संधी मिळते हे पाहावं लागणार आहे. सध्या ४ ते ७ या जागांवरच अजित पवार यांना थांबावं लागेल असं दिसतंय. त्यातही शिरुरु, बारामती, सातारा या मतदारसंघांत संघर्ष अधिक तीव्र असणार आहे. अजित पवार हे आव्हान कसं पेलणार, याकडं सगळ्याचं लक्ष आहे.
चक्रव्यूव्हात अजित पवार?
ही सगळी परिस्थिती लक्षात घेतली तर अजित पवार यांची अवस्था चक्रव्यूव्हात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झालेली दिसतेय. अशात अजित पवार या सगळ्या पातळ्यांवर कसा लढा देणार, हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचाःलोकसभेच्या रणधुमाळीला वेग, आजचा दिवस महत्त्वाचा, मविआ-महायुतींचं बैठकांचं सत्र, कोणते नेते कुठं?