पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यानंतर, आता शरद पवारांसोबत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि नेते, काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पुण्यात बोलावली आहे. या बैठकीत विलीनीकरणाची चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निर्णय उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारीला लागणार आहे. शिवसेनेप्रमाणेच, याही निर्णयात अजित पवार यांच्यासोबोतचे राष्ट्रवादीचे आमदार अपात्र ठरणार नाहीत, असंच चित्र सध्यातरी आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतले आमदारही पात्रच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं पवारांसोबतचे आमदार काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा रंगली आहे.
शरद पवार यांच्याकडून ही चर्चा फेटाळली
पुण्यात होत असलेल्या बैठकीत पक्षाचे आमदार आणि खासदार उपस्थित आहेत. या बैठकीच्या निमित्तानं ही चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बैठकीबाहेर येऊन याबाबतचं स्पष्टीकरण दिल आहे.
काय म्हणालेत प्रशांत जगताप
ही चर्चा पूर्णपणे साफ चुकीची असल्याचं प्रशांत जगताप यांनी सांगितलंय. शरद पवार यांच्या सूचनेनुसार ते बैठकीतून बाहेर येऊन त्यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. शरद पवार यांचा चेहरा हेच राष्ट्रवादीतील नेत्यांसाठी महत्त्वाचे आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात पुढची वाटचाल असेल, असं जगताप यांनी स्पष्ट केलेलं आहे.
या नेत्याच्या वक्तव्यानं चर्चेला सुरुवात
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल यांनी पत्रकरांशी बोलताना महत्वाचे विधान केले होते. शरद पवार यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन व्हावा का, या प्रश्नावर हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय असल्याचं ते म्हणाले होते. यासंबंधी चर्चा सुरु असून, लवकरच याचा निर्णय कळेल, असं ते म्हणाले होते. त्यानंतर ही चर्चा सुरु झाली होती.
असं घडलं तर काय होईल?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजपात जात असल्याचं दिसतंय. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण यासारखे मात्तबर नेते महायुतीत गेलेले आहेत. आणखीही काही नेते या रांगेत असल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर त्यांचीही ताकद कमी झालेली आहे. अशात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल, असं राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे. शरद पवार काँग्रेसमध्ये आले तर काँग्रेसलाही उभारी मिळेल असंही सांगण्यात येत आहे.