नवी दिल्ली
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. आज त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राष्ट्रवादी पक्ष अशी मान्यता देण्याचा निर्णय दिला होता. यावर शरद पवार गटाने आक्षेप नोंदवला होता.
न्या. सूर्यकांत, न्या. दीपंकर दत्त आणि न्या. के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. अजित पवार गटाकडून पक्षादेश जारी करण्याची शक्यता असल्याने तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिला होता. त्याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही अजित पवार गटाच्या नेतृत्वाखालील पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय दिला होता. याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी 15 फेब्रुवारीला निकाल दिला होता. त्यांनी आमदारांच्या विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावत त्यांना पात्र ठरवले होते. निवडणूक आयोगाप्रमाणेच त्यांनी अजित पवार यांच्या गटाची खरी राष्ट्रवादी अशी वर्णी लावली होती. त्यांच्या मते अजित पवार यांना 41 आमदारांचा पाठिंबा आहे.