मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्य विधीमंडळाचं (Maharashtra Legislative Assembly Session ) पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे . या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या माजी आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांच्या दालनात भेट घेतली आहे .गोपीकिशन बजोरिया यांनी पुत्र विप्लव बजोरिया यांच्यासह ठाकरेंची भेट घेतली.. ठाकरेंच्या शिवसेना पक्षात पुन्हा घेण्याबाबत या दोघांकडून विनंती करण्यात आली आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट शब्दात नकार देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे .
जून 2022 मध्ये शिंदे गटाने बंड पुकारल्यानंतर मविआ सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटाने शिवसेना पक्षाच्या नाव व धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताब्यात आला आहेशिवसेना पक्षातील मोठ्या बंडानंतर शिवसेना पक्षाचं नेतृत्त्वच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्याकडे घेतलं. शिंदेसोबत शिवसेनेतील 40 आमदारांनी सत्तेत जाणं पसंत केलं. त्यानंतर, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नव्याने रणशिंग फुंकलं.
विशेष म्हणजे गुरुवारीच विप्लव बजोरिया विधानपरिषदेतून निवृत्त झाले आहेत. विधानपरिषेदेच आमदार म्हणून त्यांनी 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र, निवृत्तीनंतर लगेचच त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने शिवसेना शिंदेंच्या गटात खळबळ उडाली आहे. दरम्यान, एका पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंना शिंदेंकडील आमदार परत आल्यास घेणार का, असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, आपण सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, अशा शब्दात स्पष्टपणे ठाकरेंनी भूमिका घेतली .
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने अजित पवारांच्या गटांतील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यानंतर, आता दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडील एका माजी आमदाराने उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता शिवसेना पक्षाला सोडून गेलेल्यांबाबत विचार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.