Twitter @vivekbhavsar
मुंबई
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी होतांना राजभवनावर शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणारे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे (MP Dr Amol Kolhe) यांनी नंतर यु टर्न घेत ते शरद पवार यांच्याच सोबत असल्याचे स्पष्ट केले होते. याच डॉ अमोल कोल्हे यांनी आता २०२४ च्या लोकसभा निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याची खात्रीलायक माहिती असून या मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे अजित पवार गटाचे उमेदवार असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. या माहितीला शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सूत्रांनी दुजोरा दिला.
डॉ अमोल कोल्हे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) शिवाजीराव आढळराव पाटील या सलग तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या तत्कालीन खासदाराचा पराभव केला होता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फुट (split in Shiv Sena) पडली तेव्हा आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले. तर राष्ट्रवादी पक्षात बंडाळी झाली तेव्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या चार पैकी तीन खासदारांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला, त्यात सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), श्रीनिवास पाटील यांच्यासोबत डॉ अमोल कोल्हे यांचाही समावेश होता.
अजित पवार गटाने पक्ष आणि चिन्ह यांच्यावर दावा करतांना ज्यांनी व्हीप नाकारला, त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission of India) दिले होते. त्यात आधी डॉ अमोल कोल्हे यांच्याही नावाचा समावेश होता. मात्र, नंतर अजित पवार गटाकडून (Ajit Pawar faction of NCP) डॉ कोल्हे यांचे नाव वगळण्यात आले. त्यामुळे डॉ कोल्हे यांना पक्ष शिस्तभंगाच्या कारवाईपासून अभय मिळाले आहे. याबद्दल डॉ कोल्हे यांनी अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले होते. ही भेट केवळ आभार माणण्यासाठी नव्हती तर पुढची रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा निवडणूक लढवू नये आणि या जागेवर अजित पवार गटाला उमेदवार उभा करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशीही चर्चा या भेटीत झाल्याचा दावा करण्यात आला. पक्ष फुटीच्या आधी कॉँग्रेस – राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीतील जागा वाटप सूत्रानुसार शिरूरची जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्याला आली होती. तर भारतीय जनता पक्ष – शिवसेना युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येत असे.
शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा विद्यमान खासदार असल्याने अजित पवार गटाला शिंदे-फडणवीस- पवार महायुतीमध्ये (Shinde – Fadnavis – Pawar Mahayuti) या जागेवर दावा करायचा आहे. तर आढळराव पाटील हे शिंदे गटासोबत असल्याने शिंदेनाही ही जागा शिवसेनेसाठी सोडली जावी अशी अपेक्षा आहे. मात्र, महायुतीतील धर्मानुसार ही जागा राष्ट्रवादीला सोडली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कर्जत येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार यांनीही आज स्पष्ट केले की त्यांचा पक्ष रायगड, शिरूर, बारामती आणि सातारा या निवडून आलेल्या चारही लोकसभा मंतदारसंघात त्यांचे उमेदवार देणार आहे. याचाच अर्थ या चारही मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे सेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी अजित पवार यांनी चर्चा केली असून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी अशी इच्छा प्रदर्शित केली आहे. मात्र, अजूनही एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील यांना तसा ग्रीन सिग्नल दिलेला नाही.
पालघरमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावीत (MP Rajendra Gavit) शिवसेनेकडून आणि सेनेच्या चिन्हावर निवडणूक लढले आणि जिंकून आले, किंवा कोंकण शिक्षक मतदारसंघात शिंदे सेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले आणि निवडून आले. तसाच प्रकार शिरूर लोकसभा निवडणुकीत होऊ शकेल, अशी शक्यता सेनेच्या सूत्रांनी व्यक्त केली.
यासंदर्भात शिवजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता योग्य वेळी निर्णय घेऊ, असे सांगितले. तर डॉ कोल्हे यांनी फोन कॉल आणि संदेशलाही उत्तर दिले नाही.