X: @therajkaran
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे (Thackray) मुखपत्र असलेल्या सामना (Saamana) मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर न्यायव्यवस्थेवरून जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. या सरकारने देशातील न्यायालये राजकीय घोडेबाजारात उभे करून संवैधानिक घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तसेच काही दिवसापूर्वी कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay) यांनी राजीनामा दिला व थेट भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसवर टीका केली. न्यायाधीश पदावर असताना गंगोपाध्याय यांनी राजकीय पक्षात प्रवेश करणे हा कुठला न्याय असे म्हणत त्यांनी न्यायालयाच्या सर्वोच्च आसनावर बसून भाजपासाठी काम करणारे अभिजित गंगोपाध्याय हे एकमेव नाहीत, तर असे अनेक ‘गंगोपाध्याय’ मोदी-शहांनी जागोजाग बसवले असल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.
न्यायालयाच्या आधारावर आपली भारतीय लोकशाही उभी आहे. न्यायालये ही लोकांसाठी असतात. लोकांना ती जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्या दुर्वर्तनाचा जाब विचारण्याचाही लोकांना अधिकार आहे. त्यामुळे गंगोपाध्यायांसारखे तिचे पोकळ खांब आता उखडूनच टाकले पाहिजेत. नाहीतर भाजपची एजंटगिरी करणारे न्यायासनावर बसून पदाचा गैरवापर करतील, अशी भीती अग्रलेखातून व्यक्त केली आहे.
हायकोर्टात व सर्वोच्च न्यायालयात असे किती गंगोपाध्याय भाजपने बसवले आहेत व ते न्यायासनावर बसून कोणता घोडेबाजार करीत आहेत, याचा शोध सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी घ्यायचा आहे. मोदी-शहांना हवे तेच निकाल देणारे न्यायाधीश त्यांना हवे आहेत व त्यासाठीच भाजपने जागोजाग ‘गंगोपाध्याय’ निर्माण केले आहेत, असा हल्लाबोल सामनातून चढवला आहे.
भाजपने सर्व घटनात्मक संस्थांवर आपले हुकमी एक्के नियुक्त करून व्यवस्थेची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयासारख्या घटनात्मक संस्थाही आता राजकीय घोडेबाजारात उभ्या करून भाजपने संवैधानिक घोटाळा केला आहे. न्यायव्यवस्थेतील लोकांनी किमान विधिनिषेध पाळावेत हे भानही त्यांना आता राहिले नाही, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाने मोदी सरकारवर चढवला आहे.