मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने विधान परिषद आणि पदवीधर शिक्षण मतदार संघाच्या निवडणुका जाहिर केल्या होत्या . यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ या ४ जागांकरिता निवडणूका होणार आहेत . याची रणधुमाळी सुरु असताना आता नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे . अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ (Narahari Jhirwal) यांनी ठाकरे गटाचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार संदीप गुळवे (Sandip Gulve) यांना जाहीर पाठिंबा दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे .
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेतर्फे किशोर दराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर नुकतेच काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झालेले संदीप गुळवे त्यांच्या विरोधात रिंगणात आहेत . त्यांना पाठींबा देण्यासाठी नरहरी झिरवाळ यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांचं काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कौटुंबिक संबंधांमुळे आपण जाहीर पाठींबा देत असल्याचं झिरवाळ यांनी स्पष्ट केलं आहे . आज झिरवळ यांचा वाढदिवस आहे . त्यानिमित्त नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी त्यांची भेट घेतली. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ बंद चर्चा झाली.भेटीनंतर झिरवाळ यांनी संदीप गुळवे यांना जाहीर पाठींबा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे अजित दादांना धक्का बसला आहे .तसेच या मतदारसंघात विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून ते निवडणूक लढवत आहेत. . शिक्षक मतदारसंघात पक्षीय गणित बाजूला ठेवून पाठिंबा देत आहे, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.
या विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सध्या २१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अॅड. महेंद्र भावसार, भाजपचे विवेक कोल्हे यांचा प्रमुख उमेदवारांमध्ये समावेश आहे.