मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील सर्वात हाय व्होल्टेज असलेल्या बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) धूळ चारल्यानंतर आता पुन्हा ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीच्या रिंगणात उतरले आहेत . अजितदादांना शह देण्यासाठी ते तीन दिवसांत अख्खी बारामती पिंजून काढणार आहेत . निंबुत या गावापासून शरद पवार यांच्या तीन दिवसीय दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यांच्या दौऱ्यात युगेंद्र पवार देखील सहभागी होणार आहेत. दरम्यान, मागच्या आठवड्यात शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघाचा दौरा केला होता. आता ते संपूर्ण तालुका पिंजून काढणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे विधासभेतही थोरले पवार अजित पवारांना शह देणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे .
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात झालेली लढत ही राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरली होती. या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. या आधी देखील पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. तर आता पुढील काळात बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार यांचा पराभव होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . याआधी थोरल्या पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवार यांच्याकडे सोपवल्यावर कधीच असा बारामतीचा भाग पिंजून काढला नव्हता मात्र, आता शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ होणार आहे .
दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. स्वत: शरद पवार सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे पुन्हा एकदा लोकसभेमध्ये निवडून गेल्या आहेत. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार आणि नातू रोहित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार आहेत. त्यातील अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर आहेत. अशातच आता सुनेत्रा पवार यादेखील राज्यसभेमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे पवार कुटुंबातील पाचवा सदस्य राजकारणात उतरला आहे.