मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली त्यामुळे भाजपाला चांगलाच फटका बसला . या निवडणुकीत महायुतीला (mahayuti )अवघ्या १७ जागांवर यश मिळालं त्यात भाजपाला २३ जागांवरून अवघ्या ९ जागांवर विजय मिळाला . भाजपचा महाराष्ट्रात झालेला हा पराभव भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे या पराभवावर चर्चा करण्यासाठी आज दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक (BJP Meeting) होणार आहे. तसेच या बैठकीत विधानसभा निवडणुकीवरही चर्चा होणार असून भाजप आणि महायुती मोठा मास्टरप्लॅन आखणार असल्याची माहीती समोर आली आहे . त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपच्या आजच्या बैठकीत पक्ष संघटनेबाबत तसेच नव्या फेरबदलाबाबत चर्चा केली जाणार असून पक्षात नव्या चेहऱ्यांना आणि मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बैठकीतील या दोन महत्त्वाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अशोक चव्हाण, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे . विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भूपेंद्र यादव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी आणि अश्विनी वैष्णव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा प्रभारी आढावा घेणार आहे.