मुंबई : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन गोंधळ उडाला. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जरांगे पाटलांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. आमदार आशिष शेलारांनी सभागृहासमोर औचित्याचा मुद्दा सादर केला.
जरांगेंचा बोलविता धनी कोण?
भाजप नेते आशिष शेलार यांनी जरांगेंचा बोलविता धनी कोण, याची सखोल चौकशी करावी. यासाठी एसआयटी स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनात जेसीबी कोणत्या कारखान्यातून आल्या, ते कोणासोबत बैठक घेत होते, त्यांना या आंदोलनासाठी कोण अर्थसहाय्य करीत होते, याचा तपास करावा अशी मागणी शेलारांनी केली. एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.
जरांगे पाटलांचे फडणवीसांवर गंभीर आरोप
माझ्यावर सलाईनमधून विषप्रयोग करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता. माझा बळी घ्यायचा असेल तर सागर बंगल्यावर घ्या”, असं खुलं आव्हान जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे. हे षडयंत्र फडणवीसांचे असून शिंदे आणि अजित पवारांचे लोकही यामध्ये सामील असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस यांचा हा बामणी कावा आहे, असंही ते यावेळी म्हणाले होते.