रायगड
‘रयतेचे राज्य कसे असावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य असून अनेक आक्रमक परतवून लावत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. रायगडच्या या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केले याचा रायगडकरांना अभिमान आहे’; अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी रयतेचा राजाला अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आलेल्या स्वराज्य सप्ताहाचा आज किल्ले रायगडावर समारोप झाला.
या भूमीत स्वराज्याची कल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात होती. देशभरात वेगवेगळ्या नावाने राज्य प्रसिद्ध होती मात्र हे राज्य कधी भोसलेंचे म्हटले गेले नाही तर रयतेचे राज्य म्हटले गेले असेही सुनिल तटकरे म्हणाले. सर्वधर्मसमभाव… शाहू – फुले – आंबेडकरांची सामाजिक क्षमता जतन करत शिवभक्त म्हणून जी प्रेरणा आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होत राहिल त्या प्रेरणेची ज्योत राज्यभरातच नव्हे तर देशभरात दुमदुमून टाकण्याचे काम सर्वांनी करावे असे आवाहन सुनिल तटकरे यांनी यावेळी केले.
स्वराज्य सप्ताहाचा समारोप सोहळा स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या सहका-यांसमवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे आणि जगदीश्वराचे दर्शन घेतले. दिनांक १२ फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे स्वराज्य सप्ताहाचा शुभारंभ मोठ्या थाटात पार पडला. मुंबई, ठाणे, वाशी, कल्याण, पुणे लालमहाल, शिवनेरी, सिंहगड, पोलादपूर, महाड अशी यात्रा स्वराज्य ज्योत आणि पताका घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी किल्ले रायगडावर पोचली. या सप्ताहात ठिकठिकाणी रयतेचे मेळावे, आणि विविध उपक्रम राबविण्यात आले. या ज्योतीचे स्वागत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी रायगडावर केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश पुतळ्यासमोर सुनिल तटकरे हे नतमस्तक झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीसभाई नायकवडी, स्वराज्य सप्ताहाचे समन्वयक लतिफ तांबोळी, प्रदेश उपाध्यक्ष बाप्पा सावंत, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, गडकिल्ले संवर्धन सेलचे राज्यप्रमुख योगेश शेलार, राष्ट्रवादी सेवादलचे राज्यप्रमुख राजेंद्र लावंघरे, उपाध्यक्ष प्रकाश काटकर, रायगड महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंडे,महाड तालुकाध्यक्ष निलेश महाडिक, तालुका सरचिटणीस बाळा सकपाळ, जिल्हा महिला सरचिटणीस सुचिता निगुडकर, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व युवक कार्यकर्ते, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.