नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांचं नाव शुक्रवारी राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्यात आलं आहे. सुधा मूर्ती या प्रसिद्ध व्यावसायिक आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. तर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक यांच्या सासूबाई आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी समाज माध्यमावर याबद्दल माहिती दिली. पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्तींना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केलं आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती महिला शक्तीचं प्रमाण आहे. सामाजिक काम आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी प्रेरणादायी योगदान दिलं आहे.
राज्यसभेसाठी नामनिर्देशित झाल्यानंतर सुधा मूर्ती म्हणाल्या, मला आनंद आहे. मात्र आता माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे. पंतप्रधानांनी यापूर्वीही माझ्या कामाचं कौतुक केलं आहे. मी त्यांचे आभार मानते. गरीबांची मदत करण्यासाठी मला आता मोठं व्यासपीठ मिळालं याचा मला आनंद आहे.
मी स्वत: राजकारणी मानत नाही. मी नामनिर्देशित राज्यसभेची सदस्य आहे. माझ्या जावयाचं राजकारण त्याच्या देशासाठी वेगळं आणि माझं काम वेगळं आहे.
सुधा मूर्ती कन्नड आणि इंग्रजी साहित्यातील त्यांच्या योगदानासाठीही ओळखल्या जातात. त्यांनी विविध शैलीत ३० हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांचं अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. त्यांच्या काही प्रसिद्ध पुस्तकांमध्ये द मदर आय नेव्हर न्यू, थ्री थाऊजंड स्टिचेस, द मॅन फ्रॉम द एग, मॅजिक ऑफ द लॉस्ट टेम्पल यांचा समावेश आहे.