महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकसभा निवडणूक लढण्यापूर्वी सुनील तटकरे जाणून घेणार पदाधिकाऱ्यांची मते 

X : @milindmane70

मुंबई: देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections 2024) वारे जोमाने वाहू लागले असून कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे नाहीत. मात्र, भाजपकडून रायगड लोकसभा मतदारसंघावर दररोज दावा केला जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मागील पाच वर्षाची राजकीय स्थिती कायम आहे की नाही, याची चाचपणी करण्यासाठी उद्या मंगळवारी विद्यमान खासदार व अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी मुंबईत मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली आहे. या आढाव्यानंतरच लोकसभा निवडणूक लढणार की नाही याचा अंदाज घेतला जाईल, अशी शक्यता तटकरे समर्थकांकडून वर्तवली जात आहे

पक्ष फुटीनंतर सुनील तटकरे हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर विभागणी झाली आहे.  त्यातच दक्षिण रायगड भाजपा कार्यकर्त्यांकडून हा मतदारसंघ भाजपाने लढावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

रायगड भाजपाने (Raigad Lok Sabha constituency) लढण्यासाठी केंद्रापासून ते राज्यातील भाजपाचे नेते आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी पूर्वाश्रमीचे शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना पक्षात घेऊन त्यांना दक्षिण रायगड भाजपा जिल्हाध्यक्षपद बहाल केले. त्यांना लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी मतदारसंघातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली व गुहागर या विधानसभा मतदारसंघात मेळावे घेण्यास सांगितले.  त्याप्रमाणे त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 

दक्षिण रायगड भाजपा नेतृत्वाकडून रायगड मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून मेळावे, दौरे आयोजित करण्यात आले, बूथ कमिट्या नेमण्यात आल्या. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पेणमधील जाहीर सभा व भाजपाच्या सर्व नेत्यांच्या रायगडमधील बैठका व दौरे पाहता भाजपा रायगड लोकसभा निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे. त्याच्या विपरीत, खासदार सुनील तटकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार दौरे, जाहीर सभा, बूथ कमिट्या, कार्यकर्त्यांशी संवाद असे कोणतेही उपक्रम न केल्याने राष्ट्रवादीतच दोन गट पडले. आपल्याकडे किती कार्यकर्ते आहेत याची चाचपणी देखील तटकरे यांनी केली नसल्याने कार्यकर्तेदेखील नाराज असल्याचे बोलले जात आहे.

भाजपाने (BJP claims on Raigad LS seat) केलेला दावा बघता हा मतदारसंघ हातून निसटून गेल्यावर त्याचे दूरगामी परिणाम तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तटकरे कमालीचे धास्तावल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून खाजगीमध्ये सांगितले जात आहे.

या मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढण्यास अनुकूल वातावरण आहे की नाही, मागील पाच वर्ष सोबत असणारे कार्यकर्ते व गावागावातील राष्ट्रवादीचे अस्तित्व किती आहे, याची चाचपणी करण्यासाठी मतदारसंघाची आढावा बैठक प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गरजे यांनी मुंबईतील महिला विकास मंडळाच्या सभागृहात  आयोजित केली आहे.  या बैठकीस प्रभारी व मंत्री, जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष आजी- माजी खासदार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी (पेरेंट बॉडी), फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष, पक्षाचे त्या – त्या विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेल्या परंतु मुदत संपलेल्या नगर परिषदा व जिल्हा परिषदेचे आजी, माजी सदस्य व सहकार क्षेत्रातील मान्यवर या पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. 

या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर निवडणूक लढण्याबाबत सुनील तटकरे निर्णय घेणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये खाजगीत चर्चिली जात आहे. 

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात