मुंबई
‘आपल्याला बारामतीचा, महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचा आहे. यासाठी नुसता खासदार निवडून द्यायचा आणि त्याने संसदेत फक्त भाषणं करायची, यातून प्रश्न सुटत नाहीत. मी मतदारसंघात न येता, मुंबईत बसून उत्तम संसदपटू म्हणून खिताब मिळविला असता तर मतदारसंघातील कामं झाली असती का? नुसतं सेल्फी घेऊन कामं होत नसतात, अशा शब्दात अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टीका केली होती. यावर आज सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना खणखणीत उत्तर दिलं. आज माध्यमांशी त्या बोलत होत्या.
‘सेल्फीचं प्रमोशन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. देशातील सर्व शाळांमध्ये मोदींचा फोटो आणि त्यासोबत सेल्फी पॉइंट काढण्याच्या सूचना शिक्षण विभागाला यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. १ कोटी महिलांसोबत सेल्फी काढा, असं पंतप्रधान मोदींनीच स्मृती इराणींना सांगितलं होतं’, असं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या टीकेचा समाचार घेतला. त्या पुढे म्हणाल्या, पुण्यातील पुस्तक प्रदर्शनात पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या फोटोचे सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते. त्याशिवाय दिल्ली विमानतळ्याच्या प्रवेश द्वाराजवळच मोदींचा मोठा सेल्फी पॉइंट आहे, असंही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांना अनेकदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांची संसदेतील भाषणं नेहमी गाजतात. यावरही अजित पवारांनी टीका केली होती. यावर सुळे म्हणाल्या, संसदेत भाषण करण्यासाठी लोक आपल्याला निवडून देतात. भाषण केल्याशिवाय प्रश्न सुटणार कसे. ही दडपशाही नाही. अनेक महत्त्वाचे मुद्दे मी एकटीने संसदेत मांडले आणि त्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली. पेटीएम घोटाळ्याचा मुद्दा सर्वात आधी मी संसदेत मांडला. हा प्रश्न लोकांशी संबंधित आहे. त्यामुळे एक खासदार म्हणून त्याविषयी बोलणं माझं कर्तव्य आहे.