मुंबई
गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून जिंकलेल्या मतदारसंघाच्या जागा महायुतीत शिंदे गटाकडे कायम राहिल असा दावा पक्षाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात वेगळ चित्र दिसून येत आहे.
दक्षिण मुंबई
गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत निवडून आले होते. त्यामुळे या जागेवर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवतील अशी शक्यता होती. मात्र त्यांची राज्यसभेत वर्णी लागल्यानंतर शिंदे गटाकडे या जागेसाठी तगडा उमेदवार दिसत नाही. त्यामुळे या जागेवर भाजपकडून उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. दक्षिण मुंबईतून राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांचे नाव निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसांपूर्वी पियुष यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. पियुष गोयल या मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी खात्रीलायक माहिती भाजपच्या एका नेत्याने दिली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर ते लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातून शिवसेनेचे ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत. ही जागा शिंदे गटाला मिळावी यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपले बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारीची तयारी सुरू केली आहे. मात्र यातून जागा मिळवणं अवघड जाईल, असं भाजपच्या सर्वेक्षणातून समोर आल्याने नारायण राणे यांना विनायक राऊत यांच्याविरोधात उतरवण्याची तयारी सुरू आहे. मात्र शिंदे गटाने ही जागा मिळवल्यास नारायण राणेंसाठी पुढे कठीण जाऊ शकतं.
पालघर
पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना भाजपकडून लढण्याचे वेध लागले आहेत. २०१८ मध्ये ते भाजपच्या वतीने पालघरमधून पोटनिवणुकीत लोकसभेवर निवडणूक आले होते. २०१९ मध्ये पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने गावित यांनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारली होती. २०१९ मध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने जागा तुमची मात्र उमेदवार आमचा या न्यायाने भाजपचे राजेंद गावित पालघरमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. आताही गावित यांनाच लोकसभेची उमेदवारी दिली तर ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून निवडणूक लढवतील, अन्यथा इथे नवीन उमेदवार देऊन गावित यांना विधानसभेचे तिकीट दिले जाईल.