मुंबई
जागतिक बँकेच्या एका अहवालावरुन ठाकरे गटाने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, १८० रुपयांवर गुजराण करणाऱ्या देशांच्या यादीत दक्षिण आशिया खंडातील सर्वाधिक देशांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये भारतातील ७० टक्के नागरिकांचा समावेश आहे.
२०२३ च्या बहुआयामी गरिबी निर्देशांक अहवालानुसार जगातील सर्वात गरीब लोकांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल ३८९ दशलक्ष लोक दक्षिण आशियामध्ये राहतात. गरीबांच्या या लोकसंख्येत एकट्या हिंदुस्थानचा वाटा सुमारे ७० टक्के आहे, असं भाष्य ठाकरे गटाने केले आहे.
दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या वा रोजगार देऊ, अशा भूलथापा देऊन विद्यमान सरकारने सत्ता मिळवली खरी पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. उलट मोदी सरकारत्या काळात बेरोजगारीच्या संख्येने उच्चांकच प्रस्थापित केला, असा हल्लाबोलही ठाकरे गटाने केला.
जागतिक बँकेच्या अहवालामुळे विकास आणि प्रगतीचा टेंभा मिरवणाऱ्या जगभरातील देशांचं पितळ उघडं पडलं आहे. गरिबीमुक्त जग हे जागतिक बँकेचे ध्येय असले तरी एकट्या जागतिक बँकेने असा संकल्प करून भागणार नाही.