मुंबई: राज्यातील शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्यानंतर लोकसभेची (Lok Sabha elections) ही पहिलीच निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर (NCP Sharad Pawar) शरद पवार यांनी नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी ते स्वतः राज्याचे दौरे करत आहेत. त्यांच्याकडून भाजपला (BJP) धक्का देण्याची तयारी सुरु आहे. भाजपच्या बड्या नेत्याला लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश देणार आहे. भाजपचे दिंडोरीतील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण
(Harishchandra Chavan) राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपला (BJP) मोठा धक्का बसणार आहे.
माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण गेल्या काही महिन्यांपासून भाजपासून दूर आहेत. भाजपाच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांच्या विरोधात हरिश्चंद्र चव्हाण मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीत गेले तर भाजपला दिंडोरी लोकसभेत फटका बसू शकतो.
गेल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार असताना भाजपाने हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी काढून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. यामुळे हरिश्चंद्र चव्हाण पक्षावर नाराज होते. आता ते राष्ट्रवादीच्या (NCP) वाटेवर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघासाठी शांतीगिरी महाराज इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. परंतु मंगळवारी श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे आपणास तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार असल्याची भूमिका शांतीगिरी महाराज यांनी मांडली. श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेनंतर शांतिगिरी महाराज नाराज झाले आहेत. परंतु सध्या ते मविआच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नाही.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मैदानात जोरात उतरण्याची तयारी शरद पवार यांनी सुरु केली आहे. भाजपने राष्ट्रवादीत फूट पाडल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आपले लक्ष भाजपकडे वळवले आहे.