मुंबई: राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदार संघात सुप्रिया सुळे (Supriya Sule )आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांची भावजय म्हणजेच सुनेत्रा पवार या उभ्या राहतील हे जवळपास निश्चित झाले आहे. असे असताना मंगळवारी बारामती येथे एका कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी “तुम्ही साथ दिली तर मोठं पाऊल उचलेन” असं सूचक वक्तव्य केले असून त्यांच्या या व्यक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटले की, दादांना आणि मला तुमची साथ हवी आहे. जर तुमची साथ असेल तर मी मोठं पाऊल उचलणार आहे. मात्र, यासाठी तुमची साथ आवश्यक आहे. तुम्ही फक्त मला साथ देणं गरजेचं आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवारांच्या या व्यक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांनी असे का म्हटले असावे, या बाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब अद्याप झाले नसले तरी त्यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. त्यात अजित पवार (Ajit Pawar) विरोधात पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे विरोधक असल्याने या निवडणुकीत ते वचपा काढण्याची शक्यता आहे. विजय शिवतारे यांनी थेट अजित पवारांना विरोध केला आहे. हे नेते महायुतीत असले तरी त्यांचा विरोध राहिल्यास ही निवडणूक अजित पवार यांच्यासाठी सोपी राहणार नाही. सुनेत्रा पवार यांचा निवडणुकीत पराभव झाल्यास नाचक्की होणार असल्याने अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत फेरविचार सुरु आहे का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
बारामतीच्या छत्रपती शिवाजीनगर (Chhatrapati Shivaji Nagar) येथे महिला ग्रुपच्यावतीने ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक कार्यक्रमात त्यांनी आपली उपस्थिती लावली.
सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील या बाबत अजित पवार यांनी अनेक वेळा स्पष्ट वक्तव्य केली आहेत. मतदार संघात ‘योग्य’ उमेदवार दिला जाईल. त्याला निवडून आणा. तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास केला जाईल, याची खात्री देतो, असे अजित पवार अनेकदा म्हटले आहेत. त्यामुळे येथे नणंद-भावजयमध्ये दुहेरी लढत होणार हे निश्चित मानलं जात आहे.