मुंबई : लोकसभेच्या तोंडावर भाजप नवीन (BJP) धक्का तंत्र अवलंबणार आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) काही जागांवर दावा सोडायला तयार नाही. पण कोण निवडून येऊ शकतो? त्या आधारावर जागा वाटप व्हावे, यासाठी भाजपा आग्रही आहे. त्यासाठी भाजपा आपल्या तीन विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार असल्याची शक्यता आहे.
येत्या एक-दोन दिवसात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. मात्र, अजूनही जागा वाटप निश्चित झालेले नाही. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमध्ये अजूनही चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. एखाद्या जागेवरुन कुठलाही पक्ष सहजासहजी आपला दावा मागे घ्यायला तयार नाहीय. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. पण आज किंवा उद्यापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटप निश्चित होईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, मुंबईसाठी भाजपने आग्रही भूमिका घेतली आहे. उत्तर-मध्य मुंबईतून पूनम महाजन खासदार (Poonam Mahajan) आहेत. त्यांच्याजागी आशिष शेलार (Ashish Shelar) यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या नावाची चर्चा आहे. ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्याऐवजी पराग शाह (Parag Shah) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
सध्या उत्तर पश्चिम मुंबईतून गजानन किर्तीकर खासदार आहेत. ते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. पण ही जागा भाजपाला मिळू शकते. भाजपाकडून उत्तर पश्चिम मुंबईसाठी अमित साटम यांचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे. सध्या परिसरात त्यांचे बॅनर्स सर्वत्र दिसत आहेत. त्यांचा सामना उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्यासोबत आहे. दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. एकनाथ शिंदे यांना ठाण्याची जागा मिळणार आहे. एकूणच शिंदे गटाला 12 ते 13 जागांवर समाधान मानावे लागू शकते. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत.
दरम्यान (Mumbai) मुंबईत 5-1 चा फॉर्म्युला ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजपा पाच आणि शिवसेना शिंदे गटाला एक जागा मिळू शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबईत एकनाथ शिंदे गटाची ताकद जास्त नसल्यामुळे भाजपाकडून पाच जागांवर दावा सांगितला जात आहे.