विश्लेषण ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपसाठी हर्षवर्धन पाटलांची गरज संपली!

X : @vivekbhavsar

मुंबई : कोण हर्षवर्धन पाटील? काकाच्या जिवावर मोठा झालेला हा नेता. गेले २५ – ३० वर्षे राजकारणात असलेल्या हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांना इंदापूरच्या ((Indapur) बाहेर कोण ओळखते? असे अनेक प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका नेत्याने आमच्या पक्षासाठी हर्षवर्धन पाटील यांची गरज संपली आहे, असे स्पष्ट मत मांडले. अर्थात हे मत त्या नेत्याचे वैयक्तिक आहे की पक्षाची भूमिका देखील अशीच आहे, हे त्याने गुलदस्त्यात ठेवले.

पुणे (Pune) जिल्ह्यातील इंदापूर तालुका आणि विधानसभा मतदारसंघ (Indapur Assembly Constituency) हा हर्षवर्धन पाटील यांचा १९९५ पासून बालेकिल्ला राहील आहे. तत्पूर्वी त्यांचे काका शंकरराव बाजीराव पाटील (Shankararo Bajirao Patil) यांची बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) आणि या क्षेत्रावर एकहाती सत्ता होती. दिवंगत शंकरराव हे बॉम्बे विधिमंडळाचे (Bombay State Assembly) निर्वाचित आमदार होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरही ते सातत्याने या भागातून विधानसभेवर आणि पुढे बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले.

शंकरराव पाटील यांचा राजकीय वारसा हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आला. सन १९९५ मध्ये पहिल्यांदाच विधानसभेत अपक्ष निवडून आलेले हर्षवर्धन पाटील यांचे नशीब थोर असावे, ते पहिल्याच विजयानंतर मनोहर जोशी (Manohar Joshi Government) यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले. यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही. १९९९ पासून ते २००९ पर्यंत कॉँग्रेसच्या (Congress) तिकिटावर इंदापूरमधून निवडून येत राहिले आणि प्रत्येक सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील होत राहिले.

२०१४ च्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस स्वतंत्र लढली आणि इंदापूरमधून राष्ट्रवादीचे (NCP) दत्ता मामा भारणे निवडून आले. इथून त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला. सहकारी संस्था वाचवण्यासाठी त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, तिथेही त्यांना “शांत झोपे” शिवाय कुठलेही पद मिळाले नाही.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी (Lok Sabha elections 2024) अजित पवारांचा स्वतंत्र राष्ट्रवादी पक्ष एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीत (Maha Yuti) सहभागी झाला. त्यामुळे इच्छा नसली तरी हर्षवर्धन पाटील यांना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांचा बारामती लोकसभेसाठी प्रचार करावा लागला. अर्थात त्या आधी पाटील यांनी आणि त्यांच्या कन्येने अजित पवार यांची जाहीर सभेतून कान उघडणी केली होती. काम करणार नाही, असा निर्वाणीचा इशारा दिला होता.

अखेर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मध्यस्थी केली. आता तुम्ही दादांचे काम करा, विधानसभेला दादा तुम्हाला मदत करतील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दादांच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांना दिली. आता जागा वाटपाची वेळ आली तर अजित पवार यांनी दत्ता मामा यांची उमेदवारी परस्पर जाहीर केली, त्यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी तुतारीचा पर्याय चाचपुन बघितला.

“मला याचे वाईट वाटते की ज्या देवेंद्र जी यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी अजित पवार यांना मदत केली, तेच फडणवीस साहेब आज मला वाऱ्यावर सोडत आहेत. तर आमचे प्रदेशाध्यक्ष (Chandrashekhar Bawankule) म्हणतात, ज्याला जायचे त्याने जावे. असे असेल तर मी काय करावे,” अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी “राजकारण” शी बोलताना दिली.

तुतारी हाती घी, हा माझ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, मी अजून निर्णय घेतलेला नाही, असेही पाटील म्हणाले. दरम्यानच्या काळात पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची दोनदा भेट घेतली.

या सर्व घडामोडीवार भाजपच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांना विरोध या एकाच कसोटीवर कॉँग्रेसने आतापर्यंत पाटील यांना राजकारण मोठे केले. त्याच पवारांकडे हे पाटील जातील का? आणि पवार त्यांना घेतील का? मुळात विद्यमान आमदार ज्या पक्षाचा असतो, ती जागा त्याच पक्षाला सोडावी लागते, हे साधे सूत्र इतकी वर्षे राजकरणात घालवलेल्या हर्षवर्धन पाटील यांना समजत नसेल तर यांच्या राजकीय ज्ञानावरच मला शंका आहे, अशी टोकाची टीका भाजपच्या या नेत्याने व्यक्त केली.

हा नेता म्हणाला, की, मुळात इंदापूरच्या बाहेर पाटील यांना कोणी ओळखत नाही, राज्यात यांना मानणारा कार्यकर्ता नाही, यांच्या सोबत येणारा कोणी नेता नाही, त्यावेळी भाजपाला त्यांची गरज होती, आता नाही, हे इतके सोपे आहे, अशा शब्दात या नेत्याने पाटील यांची गरज संपली आहे, असे स्पष्ट केले. भाजपच्याच अन्य एका नेत्याने सावध भूमिका घेत पाटील यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांची नाराजी दूर केली जाईल आणि ते पक्ष सोडून जाणार नाही, याचीही काळजी फडणवीस घेतील, असा विश्वास व्यक्त केला.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात