मुंबई : राज्यातील महिनाभर चालणाऱ्या पहिल्या टप्प्यातील ५ मतदारसंघातील निवडणुकीची अधिसूचना आज बुधवारी जारी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी आजपासून अर्ज दाखल करायला सुरूवात होणार आहे. विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर येथे पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार आहे.
देशातील महाराष्ट्रासह २१ राज्यातील १०२ मतदारसंघात आजपासून अर्ज दाखल केले जाणार आहे. २० मार्च ते २७ मार्चपर्यंत अर्ज दाखल केले जाणार असून २८ मार्चला अर्जांची छाननी केली जाईल. ३० मार्चला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. देशात पहिल्या टप्प्यासाठी २१ राज्यात १९ एप्रिलला १०२ मतदारसंघात मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी नागपूरमधून भाजपच्या तिकीटावर नितीन गडकरींना उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. चंद्रपूरमधून भाजपच्या तिकीटावर सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवणार असून महाविकास आघाडीत प्रतिभा धानोरकर किंवा शिवानी वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा आहे. गडचिरोली-चिमुर या मतदारसंघामधून महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. भाजपकडून उमेदवारीसाठी विद्यमान खासदार अशोक नेते यांच्यासह डॉ. मिलिंद नरोटे, गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह अजित पवार गटातील विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे स्पर्धेत आहे. काँग्रेसच्या 9 इच्छुकांनी मुलाखती दिल्या असल्या तरी माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान, तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय युवा नेते डॉ. नितीन कोडवते या तीन उमेदवारांमध्येच तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे.
कोणत्या राज्यात किती जागांवर मतदान
अरुणाचल प्रदेश २
आसामः ५
बिहारः४
छत्तीसगढः१
मध्यप्रदेशः६
महाराष्ट्रः५
मणिपुरः२
मेघालयः२
मिजोरमः१
नागालॅंडः१
राजस्थानः१२
सिक्किमः१
तमिळनाडुः२९
त्रिपुराः१
उत्तर प्रदेशः८
उत्तराखंडः५
पश्चिम बंगालः०३
अंदमान निकोबारः१
जम्मू कश्मीरः१
लक्षद्वीपः१
पॉंडेचरीः१