मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

.. तर राज्यातील केंद्रीय मंत्र्यांसह सर्व ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा : उध्दव ठाकरे

Twitter :

मुंबई

मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारची महत्वाची भूमिका आहे, त्यामुळे जेव्हा केंद्राची कॅबिनेट बैठक होईल तेव्हा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षण विषय कॅबिनेटमध्ये मांडावा. जर एवढेही करून देखील पंतप्रधानांवर परिणाम होणार नसेल तर सर्वपक्षीय ४८ खासदारांनी राजीनामा देत दबाव गट तयार करावा, महाराष्ट्र एकजुटीची हीच वेळ आहे, असे आवाहन ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी येथे केले.

मातोश्री निवासस्थानी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde) यांनी सोमवारी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षण आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला नव्हते. एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) गद्दारांची बाजू घेण्यासाठी वेळ आहे. परंतु, मराठा आरक्षणावर (Maratha reservation) तोडगा काढण्यासाठी वेळ नाही. जे लोक त्यांच्या न्यायासाठी, हक्कांसाठी आंदोलन करत आहेत, उपोषण करत आहेत, आत्महत्या करत आहेत, त्यांच्यासाठी फडणवीसांकडे वेळ नाही. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही. राज्यातील प्रश्न सोडून दुसऱ्या राज्यात भाजपच्या प्रचारास ते गेले होते. त्यामुळे त्यांना राज्य आणि राज्यातील प्रश्न किती महत्वाचे आहेत ? हे दिसून येत आहे असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

ठाकरे यांनी यावेळी केंद्रातील मंत्र्यांना देखील आवाहन केले. राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमोर राज्यातील परिस्थिती मांडावी. राज्यात जातीपातीमध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत, त्या तोडण्यासाठी फक्त संसदेत कायदा करुनच निर्णय घेता येईल. तो घेणार नसाल तर आम्ही मंत्रिमंडळातून राजीनामा देतो, असे राज्यातील सर्व केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले पाहिजे. त्यानंतरही निर्णय झाला नाही तर राज्यातील ४८ खासदारांनी राजीनामे देऊन महाराष्ट्रातील एकता दाखवून दिली पाहिजे, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

तिकडे मणिपूर जळतंय आणि इथे महाराष्ट्र पेटत आहे. नरेंद्र मोदी मात्र फक्त भाषण ठोकून जातात. त्यांना काहीच फरक पडत नाही. यामुळे आता दिल्लीच्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील सर्व मंत्र्यांनी गोयल, गडकरी, दानवे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांनी कॅबिनेटमध्ये हा विषय मांडला पाहिजे. अन्यथा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात