X: @therajkaran
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा (Amit Shah) यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मनसे लवकरच भाजपसोबत युती करुन महायुतीचा भाग होईल, अशी शक्यता आहे. यासाठीच भाजप नेत्यांनी राज यांना दिल्ली दरबारी बोलावले होते, अशी माहिती आहे. राज ठाकरेंनी या भेटीवर “मला या म्हटले, म्हणून मी आलो”, एवढीच प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे (MNS) आणि भाजप (BJP) युतीची घोषणा मुंबईत होण्याची शक्यता आहे. मनसेने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. मनसेचा महायुतीत समावेश झाला तर त्यांना दक्षिण मुंबईची जागा मिळणार का? याशिवाय मनसे आणखी कोणत्या जागांची मागणी करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, त्यामुळे या मतदारसंघात महायुतीकडून मनसेचा उमेदवार रिंगणात उतरला तर पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, आगामी काही तासात महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार असल्याची माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यांने दिली आहे.
मुंबईत भाजपपुढे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आव्हान आहे. या साठी कोणताही धोका त्यांना पत्करायचा नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना दोन जागा देऊन त्यांना महायुतीत सहभागी करून घेण्याचा मानस भाजपचा आहे. या साठी भाजप आणि मनसेमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुप्त चर्चा सुरू आहे. आज या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.